हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार मोठमोठ्या घोषणा करताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा मोदी सरकारने (Modi Government) 17 लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येबरोबर रोजगाराचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने 17 लाख लोकांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे.
17 लाख लोकांना रोजगार मिळणार
महामारीच्या काळामध्ये देशात सर्व कारभार ठप्प झाल्यामुळे अनेक तरुणांवर घरी बसण्याची वेळ आली होती. यात कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील बसलेला दिसून आला. त्यानंतर सरकारने रोजगार निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली. मधल्या काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने 17 लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे.
गुरुवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. तसेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत 2025 केंद्र सरकारच्या सर्व इमारतींवर रुफटॉप सोलर प्लांट बसवले जातील हे देखील सांगितले आहे. पुढे अनुराग ठाकूर म्हणाले की, पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. रुफटॉप सोलर प्लांट लावणाऱ्या लोकांना बँकेकडून सुलभ हप्त्यांमध्ये कर्जही मिळेल. या योजनेतून 1 कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज मिळेल.