मोहम्मद शमीला भाजपकडून लोकसभेचं तिकीट? या मतदारसंघातून लढण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला सुद्धा लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा भाजपचा (BJP) मानस आहे. अब कि बार ४०० पार असा नारा भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे. ४०० जागा जिंकण्याच्या दृष्टीने लोकसभेच्या प्रत्येक जागेवर भाजपचं बारकाईने लक्ष्य आहे. आता भाजपने आणखी एक मोठा डाव खेळला आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammed Shami)भाजप कडून लोकसभेचे तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

भाजप पश्चिम बंगाल येथून (West Bengal) शमीला तिकीट देण्याच्या तयारीत आहे. खरं तर शमीचा मूळ जन्म हे उत्तर प्रदेश असलं तरी रणजी क्रिकेट तो बंगालकडून खेळतो. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी बंगालसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे त्याला पश्चिम बंगाल मधूनच निवडणुकीच्या रिंगणात भाजप उतरवू शकते. माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालमधून निवडणूक लढवण्यासाठी भाजप नेतृत्वाने मोहम्मद शमीशी संपर्क साधला असून त्याला पश्चिम बंगालमधून निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली आहे.

कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार शमी –

मोहम्मद शमी बसीरहाट मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो. या भागात अल्पसंख्याक मतदार जास्त प्रमाणात आहे. अशावेळी त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठीच भाजपने शमीला तिकीट देण्याची योजना आखली आहे. शमीने जर भाजपला होकार दिला तर भाजपसाठी हा प्लॅन मोठा मास्टरस्ट्रोक ठरू शकतो. दरम्यान, वर्ल्डप कप स्पर्धेत झालेल्या दुखापतीमुळे शमी सध्या विश्रांतीवर आहे. शमीवर नुकतीच लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली आणि आता तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. टी-२० विश्वचषकातही तो खेळेल कि नाही याबाबत शंका आहे.