मोहिते- पाटील घराण्याला राजकारणात इतक महत्व का दिलं जातं? पहा 3 मोठी कारणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवरत्न. सोलापूरच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र. अकलूजच्या मोहिते पाटलांच्या (Mohite- Patil Family) या ऐतिहासिक बंगल्यात शरद पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे या त्रिकुटाची भेट झाली. मोहिते पाटलांनी घर वापसी करत माढ्यातून लोकसभेसाठी उतरण्याचा निर्णय यावेळेस झाला. निवडणुकांचा हंगाम पाहता अनेक राजकीय नेत्यांचं विरोधी पक्षातून भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना, मोहिते पाटील यांनी मात्र कसलीच भीड न ठेवता भाजपला नाकारत भाजपच्याच उमेदवारा विरोधात दंड थोपटण्याचा धाडसी निर्णय घेतला. अकलूजच्या मोहिते पाटलांच्या पॉलिटिकल पॉवरला हलक्यात घेण्याची चूक भाजपाला मात्र चुकवावी लागू शकते. शरद पवारांना बळ देऊन मोहिते पाटील घराणं भाजपच्या स्टॅंडिंग खासदारांना दणका देणार, असं एकंदरीत वातावरण यामुळे तयार झालंय. पश्चिम महाराष्ट्रात मोहिते पाटील भाजपला कस डॅमेज करू शकतात? मोहिते पाटलांना हलक्यात घेणं कोणत्याही परिस्थितीत भाजपाला परवडण्यासारखं का नाहीये? रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जास्तीचं महत्व देणं भाजपच्या अंगलट येऊ शकतं का? हेच थोडंसं ग्राउंडवरून समजून घेऊयात

याला पहिलं कारण ठरतं ते सोलापूर जिल्ह्यावरचा मोहिते पाटलांचा होल्ड

सोलापूर ग्रामीण आणि शहर यात विभागलेल्या माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघावर मोहिते पाटलांचा शब्द आजही अंतिम मानला जातो. जिल्ह्यातल्या अनेक आमदारांच्या डोक्यावर मोहिते पाटलांचा हात असल्याशिवाय तो निवडून येऊ शकत नाही, अशी आजही परिस्थिती आहे. माढ्यात तर मोहिते पाटील यांनी ठरवलेला उमेदवार आजपर्यंत पडला नाही. मोहिते पाटलांनी पक्ष बदलला असला तरी कार्यकर्त्यांची निष्ठा ही पक्ष सोबत नसून ती शिवरत्न बंगल्यापाशी असते, ही यातली प्रमुख मेख. आता हेच मोहिते पाटील विरोधात गेल्यामुळे त्यात त्यांना रामराजे नाईक निंबाळकरांची सोबत असल्यानं धैर्यशील मोहिते पाटलांचे निवडून येण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत. मोहिते पाटील मागच्या काही दिवसात ज्या आत्मविश्वासाने चाली खेळतायेत त्यावरून तरी आभाळ भाजपवर कोसळणार असं एकूणच वातावरण दिसतंय.

मोहिते पाटील घराण्याला राजकारणात इतक वेटेज का दिलं जातं? Vijaysinh Mohite Patil, Madha Loksabha

दुसरीकडे सोलापूर ग्रामीण मोहिते पाटील आणि शहरात सुशील कुमार शिंदे अशी जणू सत्ता केंद्रांची वाटणीच झाली होती. मोहिते पाटील शहरात म्हणावे इतका हस्तक्षेप करत नव्हते सेम तीच गोष्ट शिंदे नाही लागू होती. म्हणूनच शिंदेंच्या या गडाला सुरुंग लावत भाजपने मागील दोन टर्म इथं बस्तान बांधलं. भाजपची सोलापूर वरची हीच कमांड मात्र आता मोहिते पाटलांमुळे ढीली होऊ शकते. ज्या राम सातपुतेंना भाजपने सोलापूरची उमेदवारी देऊ केली आहे, ते सातपुते ज्या माळशिरस मतदारसंघातून आमदार आहेत त्यामागे शिवरत्नची कृपा आहे, असं बोललं जातं. त्यात प्रश्न हा आपली पॉलिटिकल पॉवर दाखवण्याचा असल्यामुळे माढ्यासोबत भाजपची सोलापूरची जागाही पाडण्याकडे मोहिते पाटलांचा कल असू शकतो.

मतदारसंघातील महायुतीचे अनेक आमदार मोहिते पाटलांच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळतं. त्यालाही मोहिते पाटलांच्या वर्चस्वाखाली आपलं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही, हेच प्रमुख कारण असल्याचं दिसतं. भाजपमध्ये असल्यामुळे मोहिते पाटलांनाही महायुतीच्या या आमदारांना आणि राजकीय गटातटांना थेट भिडता येत नव्हतं आता मात्र राष्ट्रवादीत असल्यानं मोहिते पाटील आमदारांच्या या वर्चस्वाला नख लावू शकतात. भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी मोहिते पाटलांची ताकद असणार आहे. फक्त खासदारकीलाच नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यात मोहिते पाटील भाजपला चांगलाच डॅमेज करू शकतात…

यात दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो मोहिते पाटील प्लस, पवार प्लस, शिंदे प्लस, रामराजे हे बेरजेचं गणित…

शरद पवार यांना मराठा कार्ड चांगलं खेळता येतं. त्यातही राज्याच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता शरद पवार बाळगून असतात. तर सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते. ते ज्या सोलापूर मतदारसंघातून येतात ती जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असते. त्यामुळेच दलित समाजाची मोठी वोट बँक त्यांच्या पाठीशी असते. रामराजेंच्या रूपानं फलटण पट्ट्यातील राजकारण टप्प्यात येतं. फक्त माढाच नाही तर साताऱ्याच्या जागेवरही रामराजे प्रभाव टाकतात. आता या सगळ्यांची मोट बांधत मोहिते पाटील राजकारण करतायेत. त्यातही माळशिरसचे कडवे प्रतिस्पर्धी असणाऱ्या उत्तमराव जानकरांनासाठीही मैत्रीचा एक हात पुढे केला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या खालच्या पट्ट्यात मोहिते पाटील येणाऱ्या काळात हे बेरजेचं गणित भाजपच्या विरोधात वाजवू शकतात. शिंदेंच्या मदतीने माढ्यातील एससी समाज आणि शिंदेंच्या मदतीला धावून जात सोलापुरातील मराठा समाजाला आपल्या गोटात खेचून आणणं, हे मोहिते पाटील या बेरजेच्या राजकारणातून साध्य करू शकतात. रामराजे प्लस, मोहिते पाटील प्लस, शरद पवार अशी जेव्हा आपण बेरीज करुन पाहतो, तेव्हा भाजपच्या छातीत नक्कीच धडकी भरु शकते. त्यामुळे आमदारांच्या जीवावर मोहिते पाटलांना डावलण्याची भाजपाने केलेली चूक त्यांच्या जीवावर चांगलीच बेतू शकते…

तिसरी आणि शेवटची गोष्ट येते ती, मोहिते पाटलांमुळे राजकारणात जाणारा मेसेज

सध्याच्या घडीला भाजपच्या विरोधात जाण्याची धमक अनेक प्रस्थापित नेत्यांमध्ये होत नाहीये. भाजपमध्ये घुसमट होत असतानाही ते पक्षातून बाहेर पडण्याची रिस्क घेत नाहीयेत. भाजपकडे असणारी सत्ता आणि त्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी. मात्र धैर्यशील मोहिते पाटलांवर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप असतानाही त्यांनी भाजपला डावलण्याची धमक दाखवली. यावरून इच्छा असली तर भाजपसारख्या बड्या पक्षा सोबतही लढता येतं. हा मेसेज अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांनी आपल्या कृतीतून करून दाखवलाय. मोहिते पाटलांनी या सगळ्यात लक्षात घेतलेला फॅक्टर होता तो म्हणजे प्रतिष्ठेचा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक पहिल्या फळीतील नेत्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला. ईडी, सीबीआय यांसारख्या तपास यंत्रणांपासून वाचण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं अनेकदा बोललं जातं. या सगळ्यामुळे झालंय काय तर भाजपमध्ये अनेक नेत्यांची गर्दी झालीय. त्यामुळे भाजपतील अनेक जुन्या नेत्यांमध्ये सध्या नाराजी धुमसत आहे. मात्र स्वतःचं वेगळं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी इच्छा असतानाही ते फारसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. यावेळेस मोहिते पाटील मात्र राजकारणातील कन्फर्ट पेक्षा संघर्षाला महत्व देतात आणि भाजपच्या दिल्लीतून ठरवलेल्या उमेदवारा विरोधातच मैदानात उतरतात. यातून ‘जिथं पटत नाही तिथं राहायचं नाही’ असा मेसेजच मोहिते पाटलांनी भाजपमधील नाराज फळीला दिला आहे. त्यामुळे मोहिते पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवत येत्या काळात भाजप सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढू शकते, असाही अंदाज काही राजकीय विश्लेषक मांडतात.

थोडक्यात काय तर मोहिते पाटलांचं ग्राउंड नेटवर्क, बेरजेचं राजकारण आणि कंफर्टपेक्षा संघर्षाला त्यांनी दिलेलं महत्त्व या सगळ्या गोष्टी पाहता त्यांच्या राजकारणाला हलक्यात घेणं हे भाजपला येत्या काळात न परवडणारं ठरू शकतं. मोहिते पाटील येत्या काळात भाजपला किती आणि कसा डॅमेज करतील? माढ्याचा पुढचा खासदार कोण असेल? तुमचा अभ्यास काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.