फलटणला टोळी प्रमुखासह 12 जणांवर मोक्का

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख सुरज बोडरे व त्यांच्या 12 साथीदारांना मोक्का लावण्यात आला आहे. फलटण पोलिसांच्या प्रस्तावास कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली असून नमुद गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावुन या गुन्ह्याचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण पोलीस ठाणेच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, अपनयन, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, अपहरण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असुन टोळी प्रमुख सुरज बोडरे याने त्याचे टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी नमुद टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करुन आरोपींचेविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.

माहे नोव्हेंबर 2022 पासुन एकुण 4 मोक्का प्रस्तावामध्ये 44 इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर करवाया करणेत येणार आहेत. मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक अरुण देवकर, धन्यकुमार गोडसे, सागर अरगडे, अमित सपकाळ, संजय राऊत, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे अभिजित काशिद, अजय कडेकोट, स्वप्निल खराडे यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.