औरंगाबाद | वैजापूर तालुक्यातील गारज येथे गेल्या पंधरा दिवसापासून एका पिसाळलेल्या वानराने धुमाकूळ घातला असून घरात घुसून काचेच्या वस्तु फोडण्याचा सपाटा लावल्याने गावात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. हे पिसाळलेले वानर घरात घुसून टीव्ही, कपाटाच्या काचा, आरशे, फोटो, चारचाकी वाहनाच्या काचा अशी जी काचेची वस्तु दिसेल ती फोडत आहे.
या वानराला घरातून बाहेर काढण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यास हकलण्यासाठी गेल्यावर तो ग्रामस्थांच्या अंगावर धाव घेऊन त्यांना जखमी करत आहे.
गेल्या आठवड्यात गावातील गणेश सरोवर यांच्या घरात घुसून टीव्ही फोडला होता. तर किरण सरोवर यांच्या घरात घुसून काचेच्या वस्तु फोडल्या. तसेच शनिवारी चार वाजेच्या दरम्यान येथील जय योगेश्वर पतसंस्थेत घुसून काचेचे दोन फोटो फोडुन संगणकावर धाव घेतली असता बाहेरून ग्रामस्थांनी दगड फेकून मारल्याने संगणक वाचला.
रविवारी पुन्हा शिवनाथ कांदे यांनी दगड ऊगारला असता त्यांचा या वानराने सातशे ते आठशे फुट पाठलाग करून जखमी केले. यामुळे गावात महिला, वृद्ध, लहान मुलांमध्ये भितिचे वतावरण पसरले आहे. वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची त्वरित दखल घेऊन या पिसाळलेल्या वानरास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.