हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Tips) राज्यभरात ठिकठिकाणी धुवाँधार पाऊस सुरु आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर अखेर वरुणराजा प्रसन्न झाला आहे. राज्यभरात मान्सूनला जबरदस्त सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजासुद्धा सुखावला आहे. अनेक गावात पेरणीला सुद्धा सुरुवात झाली आहे. एकीकडे पावसाच्या येण्याने सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात कोसळणाऱ्या वीजेमुळे दुर्घटना घडत असल्याचे काही वृत्त समोर आले आहेत. पावसाळ्यात वीज कोसळणे ही नैसर्गिक घटना असली तरीही यामध्ये वित्तहानीच नव्हे तर जीवितहानी देखील होऊ शकते.
दरवर्षी मान्सून सुरु झाला की, अनेक भागांमध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडतात. आकाशात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊ लागला की, आपोआपच मन चलबिचल होऊ लागतं. कारण, वीज कोसळल्याने प्रत्येक वर्षी कुणाचा ना कुणाचा जीव गेल्याचे वृत्त आपल्या कानावर येत असतं. (Monsoon Tips) आकाशातून कोसळणाऱ्या विजेच्या ताकदीचा अंदाज लावणे जरा अवघडंच. कारण, ही वीज क्षणात राखरांगोळी करण्याचे सामर्थ्य ठेवते. तुम्हाला माहितेय का? ही वीज कशी तयार होते? ती जेव्हा कोसळते तेव्हा आपण आपला बचाव कसा करू शकतो? चला याविषयी जाणून घेऊ.
वीज कशी तयार होते? (Monsoon Tips)
जेव्हा आकाशात थंड आणि उष्ण हवा एकत्र येताना हवा जसजशी वर जाऊ लागते तसतशी आणखीच थंड होते. काही वेळात तिचे बर्फाच्या लहान लहान कणांमध्ये रुपांतर होते. हे कण एकमेकांवर आपटतात आणि हवेत तरंगायला लागतात. या कणांचे घर्षण झाल्याने त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स तयार होतो आणि आपल्याला वीज कडाडताना दिसते.आकाशात लख्ख चमकणाऱ्या वीजेचे मोजमाप करता येत नाही. मात्र, ही वीज लाखो मेगावॅटची असते. आकाशात आधी वीजेचा लखलखाट दिसतो आणि त्यानंतर आवाज ऐकू येतो. याचे कारण म्हणजे, प्रकाशाचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो.
वीज कोसळताना ‘असा’ करा स्वतःचा बचाव
1) सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोरदार पाऊस आला किंवा ढगांचा गडगडाट सुरु झाला की, त्या ठिकाणी हमखास वीज कडाडणार हे लक्षात घ्या. घरातून बाहेर पडायचे असेल तर आधी हवामान विभागाचा अंदाज पाहा. (Monsoon Tips) घराबाहेर डोकावून आकाशात काळे ढग किंवा विजा कडकडताना दिसत असतील तर घराबाहेर पडणे टाळा.
2) जर तुम्ही घराबाहेर असाल आणि आकाशात वीज कडाडण्याची चिन्ह दिसू लागली तर त्वरित एखाद्या इमारतीत शिरा किंवा थेट घर गाठा. मात्र, कोणत्याही झाडाखाली वा गुरांच्या गोठ्यात थांबू नका. अशा ठिकाणी वीज आकर्षित होण्याची शक्यता असते.
3) तसेच जर आभाळात वीज कडाडू लागली तर सगळ्यात आधी वीजेच्या उपकरणांपासून लांब राहा. (Monsoon Tips) शिवाय नळाचे कुठलेही काम करू नका आणि दारं- खिडक्यांपासून अंतर ठेवा.
4) वीज चमकताना दिसली तर लोखंड किंवा पितळच्या वस्तूंपासून लगेच लांब व्हा. (Monsoon Tips) कारण, लोखंडाकडे वीज आकर्षित होते.
5) वीज चमकताना पाण्यातही जाऊ नका. जर तुम्ही पोहत असाल तर ताबडतोब पाण्याबाहेर या. शिवाय इलेक्ट्रीक तारा, उपकरणांपासून लांब राहा. सगळ्यात आधी अंग कोरडे करा.
6)बाहेर वीज चमकत असेल आणि विजेचा गडगडाट होत असेल तर सगळ्यात आधी घरातील विद्युत उपकरणे बंद करा. जसे की, टी.व्ही., एसी, फ्रिज. तसेच या उपकरणांचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. (Monsoon Tips)