चित्रपटनगरी | सिनेमाचा विषय निव्वळ मनोरंजनावर आधरित नसावा तर व्यापक अर्थाने सामाजिक वास्तवाचं चित्र समाजापुढे मांडण्याचं काम सिनेमाद्वारे व्हावं ही साधारण अपेक्षा असते. ही अपेक्षा असली तरी असे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणं ही अपवादात्मक बाब आहे.
‘मंटो’ सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. सकाळचे शो रद्द झाले अशी बातमी सर्वत्र पसरली. त्यावर जाणत्या लोकांनी ट्विटरच्या माध्यमातुन ट्वीट करत त्याबद्दल खेद व्यक्त केला. दुपारनंतर लीगल प्रॉब्लममुळे शो रद्द झाले अशी माहिती समोर आली. मग पुन्हा दुसरा शो सुरु आहेत असं कळालं. तोपर्यंत सोशलमीडियावर तूफान चर्चा झाल्या. कोणी म्हणालं की हा सरकारचा डाव आहे. मंटो त्यांना पचणार नाही म्हणून सरकारने असले अडथळे जाणीवपूर्वक निर्माण केले आहेत. तर कोणी म्हणत होतं असले सिनेमा दाखवून काय साध्य होणार? या सगळ्या घडामोडीनंतर सिनेमा प्रदर्शित झाला.
अगदी मोजक्या सिनेमागृहात हा सिनेमा पहिल्या दिवशी लागला. तिकिट काढायला गर्दी असेल असं वाटलं मात्र सिनेमागृहात बोटावर मोजता येतील इतके लोक होते. त्यात ज्यांना थोडाफार मंटो माहित आहे ते आणि ज्यांना मंटो माहीत करून घेण्याची थोडीफार इच्छा आहे ते असे मोजके लोक सिनेमागृहात होते. हे सगळं साहजिक आहे कारण जिथे भारतीय लोकांना भारतीय साहित्यिक माहित नाहीत तिथे पाकिस्तानी साहित्यिक माहित असणं केवळ आदर्शवत स्वप्न ठरावं.
मंटो’ हा खऱ्या अर्थाने व्यक्तिविशेष प्रकारातला चित्रपट आहे. बॉलीवुड विश्वात असा ट्रेंड अगदी अलीकडच्या काळात सुरु झाला. इतिहास जमा झालेली व्यक्ती नव्याने पुढे करुन त्या व्यक्तीला ‘न्याय’ देण्याचा प्रयत्न अशा सिनेमातून केला जातो. दिग्दर्शक नंदिता दास यांनी आपल्या खास शैलीत मंटो या सिनेमातून सआदत हसन मंटोचा जीवनक्रम मांडला आहे.
मंटोचं जीवन वादळात अडकलेल्या बोटीप्रमाणे हेलकावे खात पुढे जाणारं. मंटोचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील एका मुस्लिम कुटुंबात झालेला. अगोदरच्या पिढ्या भारतीय म्हणून जीवन जगलेल्या. फाळणीनंतर मंटोने भारतात राहण्याचा निर्णय घेतलेला पण पुढे हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे मंटोला भारतात अस्वस्थ वाटू लागते म्हणून तो पकिस्तानात स्थायिक होण्याचा निर्णय घेतो. एक लेखक, कथाकार, पत्रकार म्हणून त्याची ओळख तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात पसरलेली. पाकिस्तानात स्थायिक झाल्यानंतर देखील त्याच्यावर येणारे आक्षेप कमी होत नाहीत. मंटोचं लेखन अनुभवाधारित असल्याने समाजात घडणारं वास्तव आपल्या लिखाणामधून मांडतो. समाजात असणाऱ्या प्रत्येक घटकात एक अदृश्य कथा असते तीच वास्तविकता असते आपण लेखक म्हणून ते वास्तव समाजापुढे मांडलं पाहिजे असं मंटोचं ठाम मत असल्याने मंटो समाजात वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांचं दाहक आणि वास्तव चित्र आपल्या लिखाणातुन मांडतो.
पण हे वास्तव तथाकथित सभ्य समाजाला पचनी पडत नाही म्हणून मंटोचं लिखाण हे संस्कृतीला घातक आहे. मंटो अश्लील लिहीतो त्याच्या लिखाणावर बंदी आणायला हवी, असं संस्कृतीरक्षकांचं म्हणणं. त्यामुळे मंटोवर न्यायालयात खटला भरवला जातो. अशा एकूण सहा खटल्यापैकी अगोदरचे तीन खटले भारतात तर नंतरचे तीन खटले पाकिस्तानमध्ये मंटो विरोधात भरवले जातात. ‘ठंडा गोश्त’ नावाची कथा लिहल्यानंतर पाकिस्तानमधील संस्कृतीरक्षकांचं पित्त चांगलंच खवळतं. मंटोच्या आयुष्यातली ही कथा त्याच्या आयुष्याला आगीच्या तोंडात नेऊन टाकते. एकूण सहा खटल्यात विरोधकांच्या हाती तो लागत नाही.
हा सगळा घटनाक्रम सिनेमा पाहत असताना प्रेक्षकांना मंटोत गुंतुन ठेवतो. शेवटी त्याच्या वाट्याला आलेलं दारिद्रय आणि दुःख त्याला दुबळं करणारं ठरतं. त्यात सुद्धा मंटो लेखणीवरचं प्रेम कमी होऊ देत नाही. दिग्दर्शक नंदिता दासने मंटोच्या पात्रासाठी नवाजउद्दीन सिद्दीकी का निवडला? हे सिनेमा बघताना सहज लक्षात येतं. मंटोच्या पात्रात नवाजुद्दीन सिद्दिकीने जीव ओतून मंटो पडद्यावर जिवंत केलाय. सिनेमातला प्रत्येक संवाद भाव खाऊन जातो.
मंटोच्या जीवनाकडे बघत असताना फक्त एक लेखक आहे म्हणून बघणं त्याच्यावर अन्याय करणारं ठरतं. हे तत्कालीन समाजाने केलं .तेच कमी अधिक फरकाने आजही होताना दिसतं. भारताची फाळणी झाल्यानंतर जे काही राजकीय,सामाजिक पेच निर्माण झाले त्याचा प्रभाव लेखक म्हणून मंटोच्या लिखाणावर झालेला दिसतो. त्या वेळची एकूण राजकीय,सामाजिक परिस्थिती पाहता मंटो समाजव्यवस्थेकडे कुठल्या दृष्टिने पाहतो हे दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक नंदिता दासने केला आहे. मंटोचं व्यक्तिगत आयुष्य प्रचंड दुःखाने व्यापलेलं असलं तरी मंटो आपल्या मतावर आणि भूमिकावर ठाम (असं ठाम राहणं सध्याच्या साहित्यिकात अपवादाने दिसतं) राहतो. सिनेमाच्या पूर्वार्धात सुख समृद्ध जीवन जगणाऱ्या मंटोचं जीवन कसं दुःखद होतं हे पाहताना प्रेक्षकापर्यंत साहित्यिकाचं दुःख पोहचतं. लेखकाच्या अभिव्यक्तीवर येणारी गदा लेखकाला जिवंतपणे मारते हेच वास्तव सिनेमा बघताना लक्षात येतं. सिनेमा जसजसा पुढे जातो तसतसं सिनेमातलं प्रत्येक पात्र प्रेक्षकावर छाप सोडून जातं.
अश्लीलता म्हणजे काय? अमुक अमुक म्हणजे अश्लीलता हे कोण ठरवणार? तो ठरविण्याचा अधिकार कोणाला? असे प्रश्न मंटो तथाकथित सभ्य समाजला विचारतो तेव्हा त्याची उत्तरं त्याला मिळत नाहीत. या अनुत्तरीत प्रश्नामुळे मंटोला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. मंटोचा मृत्यु १९५५ मध्ये झाला.मात्र आजही कित्येक साहित्यिकांना ‘अश्लील’ लेखक म्हणून तुच्छ वागणूक मिळते. लेखकाच्या अभिव्यक्तीवर येणारी गदा आजही कमी अधिक प्रमाणात साहित्यक्षेत्रातल्या लोकांच्या वाट्याला येते. समाजाच्या प्रगतीचा वेग किती आहे हे त्यावरून लक्षात यावं. म्हणून ‘मंटो’ सारखा सिनेमा कालसुसंगत ठरतो.
आजही मंटोचं साहित्य अश्लील समजलं जातं हे वास्तव आहे. कितीतरी मंटो साहित्यक्षेत्राने समाजातल्या मागास मानसिकतेमुळे संस्कृतीरक्षणाच्या ओझ्याखाली जिवंत गाडले आहेत. अशा कित्येक गाडल्या गेलेल्या मंटोला उकरून समाजासमोर आपल्या लेखणीचा आरसा धरता यावा आणि त्यात आपली माणूस म्हणून काय भूमिका असावी याचा शोध घेण्यासाठी हा सिनेमा एकदा बघणं गरजेचं ठरतं.
सिनेमाच्या मर्यादा लक्षात घेता मंटोबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यानी मंटोचं साहित्य यानिमित्ताने नक्की चाळून बघावं. ‘मंटो’ हा चित्रपट त्या अर्थाने सामाजिक वास्तव आजही आहे का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षक वर्गाने चित्रपट बघून ठरवावं. शेवटी मंटोच्या विचारांची प्रगल्भता समजून घेण्यासाठी आणि मंटोची पाळंमुळं जाणून घेण्यासाठी सिनेमात चपखल वापरलेलं मंटोचं वाक्य इथे देऊन थांबतो.
“अगर आपको मेरी कहानियां अश्लील या गंदी लगती हैं, तो जिस समाज में आप रह रहे हैं, वह अश्लील और गंदा है. मेरी कहानिया तो सच दर्शाती हैं.” – सआदत हसन मंटो
धनंजय सानप
मो.क्र. – +919850901073
ई मेल – [email protected]