औरंगाबाद : शहरामध्ये शनिवार आणि रविवार लॉकडाऊन असताना देखील शान-ए-इम्तियाज या कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन दौलताबाद रोडवरील एका हॉटेलवर करण्यात आले होते. हा कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमास खा. इम्तियाज जलील यांची उपस्थिती असल्याने हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. त्यात खा. जलील यांच्यावर नोटांची उधळण केली जात आहे.
हाती आलेल्या माहिती नुसार, या कार्यक्रमाचे नियोजित वन वाईस मजलिस ग्रुप यांनी केले होते. या ठिकाणी किमान 200 ते 400 लोकांची गर्दी होती. या कार्यक्रमात एकानेही मास्क परिधान केलेला नव्हता आणि सोशल डिस्टनसिंगचा तर पार फज्जा उडाला होता. परवानगी नसताना साऊंड दणक्यात सिस्टीम लावण्यात आली होती. याच कार्यक्रमात खा. जलील हे कव्वालीचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्यावर पैशांची उधळण होत आहे. या कार्यक्रमात कोरोना नियमावलीची पायमल्ली करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला असून जबाबदार लोकप्रतिनिधीच कोरोनाकाळातील लॉकडाऊनमध्ये अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन करून कव्वालीचा आस्वाद घेत आहेत तर अशा लोकप्रतिनिधींकडून सर्वसामान्यांनी काय आदर्श घ्यावा अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.
— Hello Maharastra Aurangabad (@AurangabadHello) July 4, 2021