Satara News : साताऱ्यातील IT पार्कसाठी खा. उदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; ‘या’ खात्याच्या जागेची केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोडोली उपनगरातील पशुसंवर्धन विभागाची जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच ती जागा उद्योग मंत्रालयाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खा. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन दिले आहे.

सातारा शहरातील गोडोली येथील पशुसंवर्धन विभागाची सुमारे 15 एकर जागा ‘आयटी पार्क’साठी उपलब्ध करून द्यावी. तसेच ही जागा या प्रस्तावाच्या प्रक्रियेसाठी उद्योग मंत्रालयाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणीही खा. उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

खा. उदयनराजे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून आयटी पार्कची सातारा जिल्ह्यात मागणी आहे. यासाठी उपलब्ध जागेचा प्रश्न मोठा आहे. सातारा एमआयडीसीमध्ये आयटी पार्कसाठी जागा अपुरी आहे. तसेच एखाद्या कंपनीला खाजगी जागेत आयटी पार्क उभारणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

सातारा शहरात अद्यावत आयटी पार्क उभे राहावे, ही साताऱ्याच्या उद्योग विश्वाच्या दृष्टीने काळाची गरज आहे. त्यासाठी आम्ही ‘इनोव्हेटिव्ह सातारा’ ही संकल्पना मांडली आहे. त्या अंर्तगत गोडोली येथील 49 ब 49 अ व 50 अ अशी 15 एकर जागा पशुसंवर्धन विभागाची (एनिमल हजबंडरी) आहे. ही जागा पोल्ट्री फार्म साठी आरक्षित होती, मात्र सध्या येथे हा प्रकल्प कार्यरत नाही. त्यामुळे ही जागा आयटी पार्क साठी हस्तांतरित करण्यात यावी.

सातारा शहराच्या आसपास 15 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञानचे ज्ञान घेणारे हजारो विद्यार्थी आहेत . कोविड नंतर पायाभूत सुविधांचा खर्च कमी करत अनेक कंपन्या सातारा, सांगली, कोल्हापूर सारख्या छोटा शहरांमध्ये सॅटेलाइट (उपकंपनी) ऑफिस सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत आयटी कंपन्या सुद्धा छोट्या पातळीवर गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत.

पशुसंवर्धन विभागाची ही जागा राष्ट्रीय महामार्गापासून 200 मीटर अंतरावर आहे. यामुळे येथे दळणवळण करणे अतिशय सुलभ होणार आहे. आयटी कंपन्यांच्या दृष्टिकोनातून विशेष आयटी झोनसाठी या जागेला मान्यता दिल्यास साताऱ्या सारख्या शहराला जागतिक पातळीवर स्थान मिळणार आहे. तसेच रोजगारासाठी पुणे मुंबईला जाणाऱ्या तरूण, तरूणींना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होईल. आयटी पार्कमुळे आसपासच्या नागरी वस्तीवर कोणतेही दुष्परिणाम होणारे नाहीत. मुख्यमंत्री या नात्याने आपण तातडीने बैठक आयोजित करून जागेचा वस्तुस्थिती पूर्ण अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवून घ्यावा. गोडोली येथील जागा सातारा आयटी कंपन्यांसाठी आरक्षित करावी, अशी मागणी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.