MSRDC News : कल्याण ते लातूर प्रवास होणार अवघ्या चार तासात ; MSRDC चा प्रस्ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MSRDC News : अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यासारखे नवनवे प्रकल्प राज्याच्या विकासाला हातभार लावत आहेत. शक्तीपीठ एक्सप्रेस त्यापैकीच एक महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. त्यामुळे दळण वळण अधिक सोपे होऊन उद्योगांना चालना मिळणार आहे. पर्यायाने राज्याच्या विकासाला सुद्धा हातभार लागणार आहे.

आता कल्याण ते लातूर हा प्रवास देखील अधिक जलद होणार आहे. या दोन्ही शहरातील आंतर कमी करण्यासाठी कल्याण-लातूर द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या कल्याण-लातूर अंतर कापण्यासाठी किमान 10 तास लागतात, मात्र आता येत्या काही वर्षांत हे अंतर अवघ्या चार तासांत कापता येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC News) कल्याण ते लातूर हा प्रवास अधिक सोपा आणि जलद करण्यासाठी ४४५ किमीचा द्रुतगती मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

राज्यातील दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यात पाच हजार किमीपेक्षा जास्त रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. सुमारे 4217 किमी रस्ते ‘MSRDC’ द्वारे बांधले जात आहेत आणि सुमारे 1050 किमी रस्ते ‘NHI’ द्वारे बांधले जात आहेत. या प्रकल्पात कल्याण-लातूर द्रुतगती मार्गाचा (MSRDC News) समावेश आहे. मुंबई किंवा कल्याणहून लातूरला जाण्यासाठी किमान दहा तास लागतात. ही बाब लक्षात घेऊन मुंबई ते लातूर दरम्यानचा प्रवास वेळ कमी करण्यासाठी कल्याण-लातूर द्रुतगती मार्ग बांधण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ आधिकऱ्यानी एका माध्यमाला सांगितले.

कसा असेल मार्ग ?

हा एक्स्प्रेस वे कल्याणपासून सुरू होऊन माळशेज घाटातून अहमदनगरला जाईल आणि त्यानंतर बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाईमार्गे लातूर शहरापर्यंत आणि तेथून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेपर्यंत जाईल. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी एमएसआरडीसीने (MSRDC News) केली आहे. शक्तीपीठ महामार्ग लातूरमधून जाणार आहे. लातूर येथील सिद्धेश्वर मंदिर या महामार्गाला जोडले जाणार आहे. एकीकडे शक्तीपीठ महामार्ग लातूरमधून जाणार असून दुसऱ्या बाजूला कल्याण-लातूर द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे.

50 हजार कोटी रुपये खर्च होणार

या महामार्गासाठी सुमारे 50 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. आराखडा निश्चित झाल्यानंतर प्रकल्पाची नेमकी किंमत स्पष्ट होईल. ४४५ किमी लांबीचा कल्याण-लातूर द्रुतगती मार्ग मुंबई-लातूर प्रवास जलद करेल. राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर एमएसआरडीसी या प्रकल्पाचा आराखडा तयार करणार आहे.