MSRTC : लालपरी प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एसटीचा प्रवास ,अधिक आरामदायी आणि जलद होण्यासाठी परिवहन मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने दरवर्षी 5 हजार साध्या लालपरी (MSRTC) बसेस स्वमालकीत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पंचवार्षिक नियोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची घोषणा केली.
यापुढे एसटी महामंडळात भाडेतत्त्वावर बसेस घेतल्या जाणार नाहीत. या निर्णयामुळे बसेसची संख्या वाढेल, एसटी बसच्या फेऱ्या वाढतील, आणि प्रवाशांना बससाठी वाट पाहत बसावे लागणार नाही. तसेच बस फेऱ्या वाढल्यामुळे गर्दीही नियंत्रणात राहील.
महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेतले (MSRTC)
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आयुक्त कार्यालयात आज झालेल्या कामकाज आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि इतर सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
परिवहन मंत्र्यांच्या सूचना (MSRTC)
बैठकीत मंत्री सरनाईक यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या:
- नवीन बस खरेदी करताना स्क्रॅपिंग प्रक्रियेचा विचार करून पंचवार्षिक योजना तयार करावी.
- प्रत्येक आगारामध्ये इलेक्ट्रिक बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य द्यावे.
- महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पूरक योजना राबवाव्यात.
- कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत देण्याची हमी द्यावी.
- शासनाकडून मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करावा.
- जाहिरात धोरण आणि उत्पन्न वाढ
- मंत्री सरनाईक यांनी नवीन जाहिरात धोरण राबवण्याचे निर्देश दिले. नव्या बसेसवर तीनही बाजूंनी डिजिटल जाहिरातींची व्यवस्था करण्याची योजना आखण्यात येत आहे. या माध्यमातून 100 कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
महामार्ग आणि डिझेलवरील सवलतीसाठी प्रयत्न (MSRTC)
महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून टोल माफी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच, डिझेलवरील व्हॅटमध्ये सवलत मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. एसटी महामंडळाच्या या नव्या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.