मुल्कः धर्मांधता ओलांडून माणूस होण्याचा प्रवास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

राष्ट्रभक्तीच्या सिध्दतेची परीक्षा नाकारणारा चित्रपट |श्रीरंजन आवटे

हिंदू,मुस्लीम खतरें मे है म्हणत एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रोजेक्ट एका टोकाला आलेला असताना ‘मुल्क’ सारखा सिनेमा होणं ही अत्यंत आश्वासक बाब आहे. (अनुभव सिन्हाच्या आधी हा सिनेमा रिलीज होऊ दिल्याबद्दल मोदींचे आणि सेन्सॉर बोर्डाचे आभार.)
दोन्ही धर्मातले कट्टरतावादी ‘भारतीयत्व’ नष्ट करु पाहताहेत. दहशतवाद हा काही कुठल्या धर्माशी संबंधित नाही तर दहशतवाद ही सामाजिक सौहार्द बिघडवणारी, तणाव निर्माण करणारी अशी कृती आहे ज्यात अस्पृश्यतेचं पालन करण्यापासून ते परधर्माविषयी द्वेष पसरवणा-या कृतीपर्यंत अनेक बाबींचा समावेश होतो. हा सिनेमा हे सुस्पष्ट भाषेत सांगतो.
दहशतवादाला जाणीवपूर्वक मुस्लीम धर्माशीच जोडलं गेलं. ‘हर मुस्लीम आतंकवादी नहीं होता;पर हर आतंकवादी तो मुस्लीम होता है’ असली चुकीची सडकछाप वाक्यं मुद्दामून सांगितली गेली. मग नथुराम गोडसेपासून ते साध्वी प्रज्ञा, वैभव राऊत, गोंधळेकर, अंदुरेपर्यंत लोक कोण आहेत ? मुस्लीम कट्टरतावाद्यांनी केला तर तो दहशतवाद आणि हिंदूंनी तेच केले तर तो राष्ट्रवाद असं कसं मानतो आपण ?
आम्ही आणि ते अशी चर्चा होऊ लागली की आपल्यात फूट पाडणारं राजकारण यशस्वी होतंय असं समजावं. सिनेमाच्या शेवटी जज म्हणतात-
“जब कोई इस मुल्क हम और वो मे बाटँने की कोशिश करे तो घर जाकर एक बार कलेडंर देख लेना कि इलेक्शन में कितना टाईम बचा है|”
आपण सारे एक आहोत, माणूस आहोत, हे म्हणणं ठामपणे मांडण्याचा प्रयत्न अनुभव सिन्हा यांनी केला आहे. अनुभव सिन्हा यांनी या काळात हा सिनेमा करणं हे निव्वळ अभिनंदनीय आहे. हे धाडस आहे. या धाडसाला मी मनापासून सलाम करतो. सिनेमातले संवाद आणि दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. तापसी पन्नूच्या तर मी प्रेमातच पडलो.
सिनेमाची स्टोरी न सांगता केवळ एक प्रसंग सांगतो, मुराद अली मोहम्मद (ऋषी कपूर) हा आरोपी आहे आणि त्याची सून आरती मोहम्मद (तापसी) डिफेंस लॉयर आहे. घराच्या छतावर बसलेले असताना मुराद तापसीला सांगतोय, लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तुझी सासू म्हणायची, आप मुझसे प्यार ही नहीं करते. मुझे पता नही चलता था की मै इसे प्रुव्ह कैसे करुं की मै सच में उसे प्यार करता हूं..प्यार होता है प्यार प्रुव्ह कैसे किया जाता है..?
आणि पुढच्या क्षणी मुरादची राष्ट्रभक्ती कोर्टात आरोपीच्या पिंज-यात उभी आहे आणि तापसीच त्याला विचारते आहे- मिस्टर मुराद अली मोहम्मद कशी सिध्द कराल देशभक्ती ? पुढे सिनेमात काय घडते, ते प्रत्यक्ष पहा.
प्रेम ही सिध्द करण्याची गोष्ट नाही. ती प्रदर्शनीय वस्तू नाही की तुम्ही डोळ्यांनी पाहू शकाल. श्वासांची लय बदलते ते सांगता येत नाही. डोळ्यातलं पाणी, उचंबळून येणारं हृदय आणि जगण्याचा आदिम आवेग,संवेग नियोजित नसतो. त्याचं पूर्वनियोजित मंचन नाही करता येत. देशाविषयी, परस्परांविषयीचं प्रेम, बंधुभगिनीभाव, गंगा जमुना तहजीब असते, ती सिध्द करायची गोष्ट नाही. राष्ट्रप्रेमाच्या सिध्दतेची परीक्षा रद्द करु या. धर्मांधतेच्या पलिकडे जात माणूस होऊ या. कबीराचं एक भजन या सिनेमात आहे-
_कहां से आया कहां जाओगे
खबर करो अपने तन की
कोई सदगुरु मिले तो भेद बतावे
खुल जावे अंतर खिडकी_
या ओळींचा अर्थ कळला तर सिनेमा सार्थकी लागेल. सार्थकी लागावा, अशी प्रार्थना.

श्रीरंजन आवटे

Leave a Comment