Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता प्रत्यक्ष ट्रॅक वर्कमध्ये दमदार प्रगती केली आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार गुजरातमध्ये बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवरचे काम अगदी रॉकेटसारख्या वेगाने सुरू आहे. गुजरातमधील विविध भागांमध्ये वायडक्टवर ट्रॅक स्लॅब बसवणे आणि सीमेंट डामर मोर्टार (CAM) भरण्याचे काम वेगाने सुरू आहे.
NHSRCL च्या माहितीनुसार, सध्या पर्यंत १९७ ट्रॅक किलोमीटरच्या बरोबरीचे ३९,५०० ट्रॅक स्लॅब्स बसवले गेले आहेत. फ्लॅश बट वेल्डिंगद्वारे २५ मीटर लांबीच्या रेल्सचे २०० मीटर लांबीचे पॅनल तयार केले जात असून, आतापर्यंत १५०० हून अधिक पॅनल्स तयार करण्यात आले आहेत. हे सगळे काम मेक इन इंडिया तत्वावर विकसित करण्यात आलेल्या यंत्रसामग्रीच्या साह्याने केलं जात आहे.
ट्रॅक वर्कसाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री
रेल फीडर कार (RFC): या कार्स २०० मीटर लांबीचे रेल पॅनल ट्रॅक बेडवर नेऊन बिछावतात. सध्या सूरत आणि आनंद जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक RFC कार्यरत असून, ७८ ट्रॅक किलोमीटर अंतरावर तात्पुरते ट्रॅक बसवले गेले आहेत.
ट्रॅक स्लॅब लेइंग कार (SLC): ही गाडी एकावेळी ५ स्लॅब उचलून त्यांना RC ट्रॅक बेडवर अचूक स्थितीत बसवते. सध्या बिलीमोरा आणि वडोदरा येथे प्रत्येकी एक SLC कार्यरत आहे.
सीमेंट डामर मोर्टार इंजेक्शन कार (CAM): ट्रॅक स्लॅब बसवल्यानंतर CAM इंजेक्शन कार त्याखाली *डिझाईन केलेल्या पद्धतीने मोर्टार इंजेक्ट करते जेणेकरून ट्रॅकची लेव्हल आणि लाइन योग्य राखली जाईल.
गुजरातमध्ये २०२८ मध्ये बुलेट ट्रेनचे पहिले ट्रायल रन
बुलेट ट्रेनचे पहिले ट्रायल रन गुजरातमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, २०२८ पर्यंत साबरमती ते वापी दरम्यान बुलेट ट्रेन धावण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण ५०८ किलोमीटर लांबीचा मुंबई-अहमदाबाद मार्ग २०३० पर्यंत पूर्णतः सुरू होणार आहे. यासाठी NHSRCL एक रायडरशिप सर्व्हे देखील करत आहे, ज्यामधून प्रवाशांची संख्या, भाड्याची व्याप्ती आणि वाहतुकीचा अंदाज घेतला जाणार आहे.
महाराष्ट्रात प्रगतीचा वेग तुलनेत मंद
गुजरातमध्ये प्रकल्प अधिक प्रगत टप्प्यावर असताना, महाराष्ट्रात मात्र काहीशा संथ गतीने काम सुरू आहे. सूरत आणि अहमदाबाद येथील बुलेट ट्रेन स्टेशन जवळपास पूर्णत्वास येत असून लवकरच ही ठिकाणं चाचणीसाठी सज्ज होतील. हा प्रकल्प केवळ देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवणारा नसून, भारतातील प्रवासाचा अनुभवच आमूलाग्र बदलणारा ठरणार आहे. गुजरातमध्ये सुरू असलेल्या वेगवान कामगिरीवरून हे स्पष्ट होते की बुलेट ट्रेनचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागलं आहे.




