हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जळगाव जिल्ह्यातील बोडवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेस अपघाताची घटना समोर आली आहे. हि घटना आज (14 मार्च) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅकवर आल्याने हि घटना घडली. अपघाताच्या वेळी रेल्वेचा वेग कमी होता , त्यामुळे मोठा अनर्थ अन हानी झाली नाही. तर चला या अपघाताचा सविस्तर आढावा घेऊयात.
कोणतीही जीवित हानी झाली नाही –
ट्रकच्या धडकेत काही डब्यांना आणि ट्रकला मोठे नुकसान झाले असून, अपघातानंतर काही काळ रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. पण अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून अडथळे दूर करण्याचे काम सुरू केले आहे . रेल्वे प्रशासनाने नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
ट्रकचालक घटनास्थळावरून फरार –
अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. पण याच्या शोधासाठी पोलिस आणि रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच या फरार ट्रक चालकाला पकडले जाईल असे सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत तपास सुरु झाला आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत –
या अपघातामुळे मुंबई हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, नागपूर आणि हावडाकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ-जळगाव रेल्वे स्थानकावर थांबवल्या तर हावडा-नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मलकापूर व अकोला रेल्वे स्थानकावर थांबवल्या आहेत . प्रवासाना होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.