Mumbai Indians चा ऐतिहासिक निर्णय!! आजच्या सामन्यात करणार ‘ही’ खास गोष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडरमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. आज दुपारी 3: 30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियम वर हा सामना होणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात मुंबईचे खेळाडू मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची जर्सी घालून खेळणार आहेत. मुंबईचा संघ आज “ESA Day” साजरा करणार आहेत. ESA म्हणजे सर्वांसाठी शिक्षण आणि खेळ… या अंतर्गत मुंबईचा संघ आज महिला संघाच्या जर्सीत दिसणार आहे.

मुंबई इंडियन्सने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना ही माहिती दिली. यासोबत संघाकडून काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये डावखुरा फलंदाज तिलक वर्मा दिसत आहेत. ‘ईएसए डे’ साठी खास जर्सी… आमचे खेळाडू महिला प्रीमियर लीगच्या मुंबई इंडियन्स महिला संघाची जर्सी घालतील आणि मुली आणि मुलांना प्रेरणा देतील असे मुंबई फ्रेंचायझीने आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे. ‘ईएसए डे’ रिलायन्स फाऊंडेशन अंतर्गत असून आजच्या सामन्यात 36 स्वयंसेवी संस्थांच्या 19,000 हून अधिक मुली वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित राहून मुंबई इंडियन्सला पाठिंबा देतील.

दरम्यान, तब्बल 5 वेळा आयपीएल विजेता असलेल्या मुंबई इंडियन्सची कामगिरी यंदा तरी संमिश्र अशी राहिली आहे. आत्तापर्यन्त खेळलेल्या 3 सामन्यात मुंबईला 1 विजय मिळाला असून 2 सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. ईशान किशन आणि आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव यांचा खराब फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय आहे . मधल्या फळीत कॅमेरून ग्रीन आणि टीम डेव्हिड हे धडाकेबाज फलंदाज मुंबईकडे आहेत मात्र अद्याप म्हणावी तशी मोठी खेळी ते करू शकलेले नाहीत. सध्या तरी फक्त टिळक वर्मा हाच जबरदस्त फॉर्मात आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे कर्णधार रोहित शर्माने दिल्ली विरुद्धच्या मागील सामन्यात दणदणीत अर्धशतक झळकवत आपण पुन्हा एकदा फॉर्मात आल्याचे दाखवून दिले आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ पुन्हा एकदा रोहित शर्मावर निर्भर असेल.