WIPL : आज मुंबई – यूपी भिडणार; फायनलचे तिकीट कोण गाठणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिला आयपीएल 2023 (WIPL) मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि UP वॉरियर्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना होणार आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना होणार असून यामध्ये जो विजयी होईल त्याला फायनलचे तिकीट मिळणार आहे, पराभूत संघ या लीगमधून बाहेर पडेल. यापूर्वी साखळी फेरीत चमकदार कामगिरी करून गुणतालिकेत अव्वल असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (DC) आधीच अंतिम फेरी गाठली आहे.

साखळी फेरीत मुंबई इंडियन्स आणि UP वॉरियर्स दोनवेळा आमनेसामने आले. त्यावेळी दोन्ही संघाने प्रत्येकी एकएकदा विजय मिळवला आहे. साखळी फेरीत मुंबईच्या संघाने एकूण 8 सामन्यापैकी 6 सामने जिंकून 12 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. तर दुसरीकडे, यूपीने 8 सामन्यांत 4 विजय मिळवले तर 4 सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे 8 गुणांसह UP वॉरियर्सचा संघ तिसऱ्या स्थानावर होता.

मुंबईच्या संघाबाबत सांगायचं झाल्यास , स्पर्धेच्या सुरुवातीला मुंबईने चमकदार कामगिरी केली. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईने सुरुवातीपासूनच फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात दमदार कामगिरी केली आहे. मात्र शेवटच्या ३ सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही हि चिंतेची बाब आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर हेली मैथ्यूज, नटालिया स्किवर, कर्णधार हरमनप्रीत कौर यांना मोठी धावसंख्या उभारावी लागेल.

दुसरीकडे UP वॉरियर्सने, आतापर्यंत परदेशी खेळाडूंच्या जोरावर सर्व सामने जिंकले आहेत. कर्णधार अ‍ॅलिसा हिली, अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा आणि ग्रेस हॅरिस यांनी संघाला प्रत्येक वेळी कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. तर गोलंदाजीमध्ये सोफी एक्लेस्टोनने दमदार प्रदर्शन केलं आहे. परंतु बलाढ्य मुंबईला पराभूत करायचं असेल तर सर्वच्या सर्व खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल हे UP वॉरियर्सला चांगलंच माहित आहे. दोन्ही संघाकडे दिग्गज खेळाडूंचा ताफा असल्याने आजचा सामना रंगतदार होणार यात शंका नाही.