Mumbai Metro 11: मुंबईसारख्या गतिशील आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय गजबजलेल्या शहरात मेट्रोसेवेचे अत्यंत महत्व आहे. वाढती लोकसंख्या, खचाखच भरलेली वाहतूक व्यवस्था आणि प्रदूषण यामुळे नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत मेट्रो ही एक वेगवान, सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक पर्याय ठरते. मेट्रोमुळे प्रवासाचा कालावधी लक्षणीय कमी होतो, वाहनांची गर्दी कमी होते आणि इंधनाचीही बचत होते. शिवाय, ही सेवा ट्रॅफिकपासून स्वतंत्र असल्यामुळे प्रवास अधिक वेळेवर आणि आरामदायक होतो. त्यामुळे मुंबई शहराच्या एकूण विकासात मेट्रोचे (Mumbai Metro 11) योगदान अमूल्य आहे.
मेट्रो ११ (Mumbai Metro 11)
मुंबईतून ठाणे आणि CSMTला जोडणारा एक अत्याधुनिक आणि ऐतिहासिक मेट्रो प्रकल्प मेट्रो ११ आता वेगाने आकार घेत आहे. विशेष म्हणजे, या मेट्रो मार्गिकेचा काही भाग समुद्राच्या खालून जाणार असून, देशातील अशा प्रकारचा हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. ठाणेकरांसाठी ही मेट्रो लाईन म्हणजे मुंबईच्या मध्यवर्ती भागाशी थेट आणि जलद जोडणीची नवी दिशा ठरणार आहे.
समुद्राखालून जाणारा मेट्रो मार्ग
वडाळा ते अपोलो बंदर अशी मेट्रो ११ ची रचना असून, ही मार्गिका मेट्रो ४ आणि ४अ चा पुढील विस्तार आहे. ठाणेच्या गायमुखपासून सुरू होणारा हा प्रवास वडाळा, शिवडी, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट, सीएसएमटी, हॉर्निमन सर्कल असा होत गेटवे ऑफ इंडिया जवळील अपोलो बंदरापर्यंत पोहोचणार आहे.
या प्रकल्पात सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे सीएसएमटी ते अपोलो बंदरदरम्यानचा समुद्राखालचा बोगदा. सध्या या विभागात भु-गर्भीय व समुद्रतळाच्या खोलीचा सखोल अभ्यास सुरू आहे. दर ५०० मीटरवर २-३ मीटर खोल खड्डे आणि स्थानक परिसरात १० ते २० मीटर खोल खड्ड्यांतून मातीचे नमुने घेण्यात येत आहेत.
बांधकामाची जबाबदारी अनुभवतज्ज्ञांकडे
या मार्गिकेच्या उभारणीची जबाबदारी आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडे देण्यात आली आहे. मेट्रो ३ सारख्या भुयारी मार्गिकेचा अनुभव असलेल्या MMRCL कडेच आता मेट्रो ११ च्या सर्व कामांची जबाबदारी दिली गेली आहे. त्यामुळे या कामाला अधिक तांत्रिक बारकावे व सुरक्षा पातळीवर अधिक गांभीर्याने हाताळले जात आहे.
ठाणेकरांसाठी मोठा दिलासा
या भुयारी मार्गामुळे ठाणेकर थेट CSMTला जलद पोहोचू शकतील. शहराच्या गर्दीमधून वेळेची बचत करत ही मेट्रो लाईन प्रवासात सुलभता आणणार आहे. विशेषतः दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या ठाणेकरांसाठी हा प्रकल्प एक मोठा गेमचेंजर ठरेल.
मेट्रो ११ प्रकल्प हे केवळ एक वाहतूक प्रकल्प नाही, तर मुंबई व ठाण्याच्या नागरी जीवनशैलीत मोठा बदल घडवणारी संकल्पना आहे. समुद्राखालून मेट्रोचा अनुभव ही एक अभूतपूर्व शहरी सुविधा ठरणार असून, मुंबईचं मेट्रो नेटवर्क जागतिक दर्जाच्या पातळीवर घेऊन जाणार आहे.