सुप्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे हृदयविकारामुळे निधन!! वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| रविवारी प्रसिद्ध उर्दू शायर, कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकारामुळे निधन झाले आहे. राणा यांनी वयाच्या 71 व्या वर्षी लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. या रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या निधनाची बातमी आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच साहित्य क्षेत्रात  शोककळा पसरली आहे.

मागील वर्षांपासून मुनव्वर राणा यांना लखनऊमधील अपोले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुनव्वर राणा यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आले होते. परंतु रविवारी उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर डॉक्टरांनी मुनव्वर राणा यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना दिली.

मुनव्वर राणा यांच्या मुलीने सांगितले  की, मुनव्वर राणा यांची तब्येत दोन-तीन दिवसांपासून बिघडलेली होती. त्यांना पोट दुखू लागल्यामुळे रुग्णालयात आणले गेले होते. त्यांना पित्ताशयाचा देखील त्रास होत होता. त्यावर शस्त्रक्रिया करूनही तब्येतीत कोणतीही सुधारणा दिसून आले नाही. त्यामुळेच त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. परंतु अखेर मुनव्वर राणा यांची मृत्यूची झुंज अपयशी ठरली.

दरम्यान, मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर आणि कवी होते. त्यांनी उर्दू, हिंदी व्यतिरिक्त इतरही भाषांमध्ये अनेक कविता लिहिल्या. या कविता लोकप्रिय देखील झाल्या. मुनव्वर राणा हे एक गझलकार असल्यामुळे त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्यांनी अनेक वेगवेगळ्या शैलीमध्ये गझल प्रकाशित केल्या. साहित्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना 2014 साली अकादमी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2012 साली त्यांना ‘माटी रतन सम्मान’ हा पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. परंतु एका वर्षानंतर त्यांनी हा पुरस्कार पुन्हा सरकारला परत केला.