जुन्या भांडणातून डोक्यात दगड घालून खून : दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
जावली तालुक्यातील मेढा गावच्या हद्दीत मेढा- महाबळेश्वर रोडवर एका युवकाचा खून झाला. जुन्या भांडणाच्या रागातून डोक्यात दगड व लाकडी फळी मारहाण करून खून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. अक्षय सोमनाथ साखरे व परमेश्वर गणपत पवार (दोघे रा. मेढा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी पहाटे मेढा गावच्या हद्दीत मेढा- महाबळेश्वर रोडच्या बाजूस असलेल्या खड्डयात मयत राम बाबू पवार (वय- 36, रा. गांधीनगर, मेढा) यांचा मृतदेह आढळून आला.

याबाबतची माहिती एस. पी. समीर शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी व अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोनि अरुण देवकर यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानंतर एलसीबीचे पोनि अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रवींद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे व स्थानिक गुन्हे शाखेकडील तपासपथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी भेट दिल्यानंतर पोनि अरुण देवकर यांनी स्वतंत्र तपासपथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना त्यांना दिल्या.

मेढा येथे राहणाऱ्या दोन संशयितांनी गुरुवारी पहाटे जुन्या भांडणाच्या कारणावरून राम बाबू पवार याचा खून केला असल्याची माहिती अरुण देवकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तपास पथकाला त्यानुसार सूचना केल्या. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या तपास पथकाने संशयित आरोपींना मेढा येथे अटक केली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरूण देवकर, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलिस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलिस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, सुधीर बनकर, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, मोमीन, वैभव सावंत, सचिन ससाणे, शिवाजी गुरव, पंकज बेसके, सायबर विभागाचे अजय जाधव. अमित झेंडे यांनी ही कारवाई केली.