Wednesday, October 5, 2022

Buy now

दाजीने मेव्हुण्याला भोकसले : उंडाळेत रेठऱ्याच्या दूध व्यावसायिकाचा खून

कराड | तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे घरगुती कारणातून दाजीने मेव्हुण्याचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना घडली आहे. अनंत चतुर्थीला रात्री 11 ते 12 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनास्थळावरून फरार आरोपीला कराड तालुका पोलिसांनी अवघ्या अडीच तासात ताब्यात घेतले आहे. सचिन वसंत मंडले (वय- 35, मूळ रा. रेठरे खुर्द, सध्या- उंडाळे, ता. कराड) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. अवधूत हणमंत मदने (वय- 42, रा. रेठरे हरणाक्ष) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंडाळे गावच्या पश्चिमेस कराड- रत्नागिरी रोडच्या बाजूस असणाऱ्या माळी वस्ती या ठिकाणी काल रात्री अनंत चतुर्थीच्या दिवशी खून करण्यात आला. रेठरे खुर्द येथील मूळ रहिवाशी असलेले सचिन मंडले हे दूध व्यावसाया निमित्ताने उंडाळे येथे भाड्याच्या घरात राहण्यास आहेत. अवधूत मदने यांनी धारधार शस्त्राने मेव्हुणा सचिन मंडले यांच्यावर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता, सचिन यास उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले होते. परंतु डाॅक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कराड तालुका पोलिसांनी संशयित आरोपी अवधूत मदने यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. मध्यरात्री करवडी येथून त्यास ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास कराड तालुका पोलिस करत आहेत. गणपती विसर्जन सुरू असतानाच घडलेल्या या खुनामुळे उंडाळे परिसरात खळबळ उडाली.