अनैतिक संबंधातून पन्नाशीतल्या एकाचा खून : आरोपीस अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
भैरेवाडी (ता.पाटण) येथील सीताराम बबन देसाई (वय- 49) यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी त्याच गावातील नारायण तुकाराम मोंडे (वय- 55) यास काल रात्री अटक केली. हा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून केल्याची कबुली अटकेतील मोंडेने दिली आहे. भैरेवाडी येथे सीमाराम बबन देसाई हे कुटुंबीयांसमवेत राहण्यास होते. शुक्रवारी (ता. 9) रात्री जेवण करून मळी नावाच्या शिवारातील गोठ्यात झोपण्यासाठी गेले होते. रात्रीच्या सुमारास त्यांचा अज्ञाताने डोक्यात दगड, वीट तसेच काठीचा मारा करत खून केला होता. शनिवारी सकाळी हा प्रकार उघड झाला.

याप्रकरणी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. याचा तपास मल्हारपेठ पोलिस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचारी करत होते. पोलिसांनी भैरेवाडीला भेट देत मिळालेल्या माहितीच्या आधारे नारायण मोंडेचा शोध सुरू केला. शोधादरम्यान तो गणेवाडी येथील जंगलात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार रात्री सात किलोमीटर जंगल तुडवत पोलिसांनी मचाणावर लपलेल्या मोंडेला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या मोंडेने खुनाची कबुली दिली आहे.

मृत सीताराम देसाईंचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मोंडेंना होता. याबाबत मोंडेने देसाईंना समज दिली होती. समज देवूनही देसाई त्या महिलेच्या संपर्कात राहात असल्याचा राग मोंडेला होता. मोंडे हा मुंबई येथे हमाली काम करतो. आठ दिवसांपूर्वी तो भैरेवाडी येथे परतला होता. यानंतर त्याने शुक्रवारी रात्री देसाईंना गोठ्यातून बाहेर बोलावत खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना चौकशीत दिली.

या कारवाईत पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सायबरचे सुनील शेळके, सहायक निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे, कर्मचारी तानाजी माने, सुधीर बनकर, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधणे, राजकुमार ननावरे, मोहन नाचण, स्वप्नील माने, शिवाजी गुरव, वैभव पवार, साळवी यांनी सहभाग घेतला होता. कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांनी अभिनंदन केले.