हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे. गेल्या काही वर्षांपासून कराड विमानतळाचे (Karad Airport) काम रखडलं आहे. मात्र आता केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कराड विमानतळाबाबत मोठी माहिती दिली आहे. कराड विमानतळाचे उर्वरीत भूसंपादनाचे काम येत्या १०-१५ दिवसात पूर्ण होऊन एकदा का हे काम झाले की मग पुढच्या काही महिन्यात कराड विमानतळ सुरु होईल. जवळपास ७० प्रवासी क्षमता असलेल्या विमानाची वाहतूक उड्डाण या ठिकाणाहून होईल असं मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी सांगितलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार असून त्याच्या जिल्ह्यातील नियोजनासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हास्तरीय अधिवेशन आज कराड येथे पार पडत आहे. या अधिवेशनासाठी मुरलीधर मोहोळ कराडला आले असताना त्यांनी कराड विमानतळाबाबत महत्वपूर्ण अपडेट दिली. मुरलीधर मोहोळ म्हणाले, तुम्ही आता महाराष्ट्रातील माणूस दिल्लीला पाठवलाय आणि योगायोगाने हे खातेही आपल्याकडे आहे. कराड येथील विमानतळाच्या भू संपादनाविषयी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आलेली आहे. त्याच्याकडून माहिती घेतली असून सुमारे ४८ हेक्टर जागेचं भू संपादन करायचे आहे. त्यातील ३८ हेक्टर जागेचे भूसंपादन झाले असून फक्त १० हेक्टर जागेचे भूसंपादन करायची प्रक्रिया राहिलेली आहे ती आम्ही पुढच्या १० ते १५ दिवसात पूर्ण करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटल.
विमातळाच्या विस्तारीकरणातील भू संपादन हाच एक महत्वाचा मुद्दा असतो. एकदा हे काम झाले की, त्याच्या पुढची कार्यवाही चालू होईल. पुढच्या काही महिन्यात आपलं कराड येथील विमानतळ चालू होऊन एअर स्ट्रीप देखील वाढेल. जवळपास ७० प्रवासी क्षमता असलेल्या विमानाची वाहतूक उड्डाण या ठिकाणाहून सुरु होईल आणि त्यादृष्टीने आपण निश्चित प्रयत्न करत असल्याचे मंत्री मोहोळ यांनी म्हंटले. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांनी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी भेट देत अभिवादन केल्यानंतर येथील स्मृतिस्थळाची तसेच कराड येथील विमानतळाची देखील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.