संपूर्ण देशामध्ये जवळपास आता ‘वंदे भारत एक्सप्रेस’ पोहोचली आहे. एवढंच नाही तर काश्मीर पर्यंत सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार आहे. जानेवारी 2025 मध्ये दिल्लीहून काश्मीरला वंदे भारतने जाता येणं शक्य होणार आहे. असं असताना आता दिल्ली ते पुणे या भागात वसलेल्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच दिल्ली ते पुणे आणि पुणे ते दिल्ली या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू होऊ शकते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली आहे. एका निवेदनाद्वारे त्यांनी पुणे ते दिल्ली वंदे भरत स्लीपर सुरू करण्याबाबत मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी इतरही महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे.
इतर रेल्वे मार्गांबाबतही प्रस्ताव
दिल्ली ते पुणे या मार्गाबरोबरच त्यांनी पुणे- सोलापूर, पुणे- नाशिक आणि पुणे- कोल्हापूर या मार्गावर देखील वंदे भारत चालवण्याची विनंती आणि प्रपोजल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे दिला आहे. सध्या यावर कुठलाच निर्णय झालेला नाही. मात्र असं मानलं जात आहे की यावर नक्कीच लवकरात लवकर निर्णय घेतला जाऊ शकतो. याबरोबरच पुणे ते जोधपुर या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावरील ट्रेनची संख्या वाढवण्यात यावी अशी देखील विनंती मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
काय केल्या मागण्या
एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर संवाद साधताना, मोहोळ यांनी वैष्णव यांच्याशी चर्चा केलेले एकूण सहा मुद्दे मांडले आहेत.
- पुणे आकाशवाणीचे प्रक्षेपण मुंबईऐवजी पुणे केंद्रावरून व्हावे आणि पुण्यासाठी ‘रेनबो’ रेडिओ वाहिनी सुरू करावी.
- पुणे आकाशवाणीला अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात यावे आणि कार्यक्रम विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी.
- पुणे ते दिल्ली दरम्यान ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरू करावी.
- पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक आणि पुणे-कोल्हापूर दरम्यान ‘वंदे भारत’ गाड्या देण्यात याव्यात.
- पुणे दूरदर्शन केंद्राचे आधुनिकीकरण करावे.
- पुणे ते जोधपूर (राजस्थान) दरम्यान धावणाऱ्या रेल्वे प्रवासाची संख्या वाढवण्यात यावी.