हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तस तस राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच गरम होऊ लागलं आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्व सत्ताधारी महायुती असा थेट सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक गोष्टीवरून दोन्हीकडून खडाजंगी पाहायला मिळते. आरोप- प्रत्यारोपाने महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आली आहे. खास करून विरोधात असलेली महाविकास आघाडी सत्ताधार्यांना वेगवेगळ्या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न करते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबईतील रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन केलं होते. निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात वातावरण निर्माण व्हावे, यासाठी महाविकास आघाडी आरक्षण आणि इतर मुद्दे उपस्थित करून भाजपविरोधी आणि स्वतःला पोषक असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरीही राज्यातील जनतेचा असा विश्वास आहे की काँग्रेसने महाराष्ट्राच्या हिताला कधीही प्राधान्य दिले नाही आणि राज्यातील महान व्यक्तींचा अपमान केला आहे.
सध्या जरी महाविकास आघाडी महाराष्ट्र धर्माचा दाखला देत महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असली तरी महाविकास आघाडीच्याच काही नेत्यांची जुनी वक्तव्ये बघितली तर जुन्या चुका महाविकास आघाडीच्या अंगलती येऊ शकतात असं बोललं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावरकर यांसारख्या दिग्गज नेत्यांना काँग्रेसने यापूर्वी विरोध केला आहे. जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात शिवाजी महाराजांना ‘विश्वासघाती दरोडेखोर’ म्हटले आहे. काँग्रेसने मध्य प्रदेश आणि बागलकोटमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे हटवले आहे. शिवाय, यापूर्वी मुंबई महाराष्ट्राला देण्यासही पक्षाने विरोध केला आहे.
शरद पवार यांनीही शिवाजी महाराजांच्या विचारसरणीला विरोध केला आहे, तर शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. कर्नाटकातील मंगळुरू येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास काँग्रेस नेत्यांनी विरोध केला आणि तत्कालीन महाविकास आघडी सरकारने अमरावती आणि दर्यापूरमध्ये त्यांचे पुतळे हटवले. कर्नाटकात काँग्रेस नेते सतीश जारकीहोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त विधान केले असून संजय राऊत यांनी त्यांच्या वंशावर प्रश्न उपस्थित केले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा पाठीमागच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशावळीवर प्रश्न उपस्थित करत अपमानास्पद वक्तव्य केले आहे.
संभाजीराजे यांच्या वंशावळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांची रक्त तपासणी करावी असे सुचविले. MVA नेत्यांवर किल्ल्यांवरील बेकायदेशीर अतिक्रमणांना आश्रय देण्याचा आणि वक्फ बोर्डाकडून मोठ्या प्रमाणावर जमीन हडप करण्यास समर्थन केल्याचा आरोप आहे. जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी औरंगजेब आणि अफझलखानाची प्रशंसा केली आणि दावा केला की शिवाजी महाराज त्यांच्यामुळेच महान होते. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा औरंगजेब आणि मुघलांचे कौतुक करताना म्हटले की त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला नाही. मुघलांपासून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा हा अनादर होता. हि सर्व जुनी वक्तव्ये महाविकास आघाडीवरच बुमरँग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.