Tuesday, June 6, 2023

संभाजीनगरात महाविकास आघाडीची 2 एप्रिलला जाहीर सभा; ‘या’ अटी पाळाव्या लागणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) यांच्या महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होणार आहे. काल किराडपुरा भागात दोन गटात राडा झाल्याने शहरात तणावपूर्ण वातावरण आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. या सभेला परवानगी देण्याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यानंतर पोलिसांनी या सभेला परवानगी दिली आहे, मात्र याचवेळी सभेसाठी काही अटी आणि शर्थी देखील घालून दिल्या आहेत.

संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर महाविकास आघाडीची ही जाहीर सभा होणार आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा उपस्थित राहतात हे ते पाहावं लागेल. राज्यात प्रथमच महाविकास आघाडी एकत्रितपणे सभा घेत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेला महत्त्व प्राप्त झालं आहे. याशिवाय या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीची एकी सुद्धा दिसणार आहे. मात्र सभेसाठी त्यांना खाली दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करावं लागणार आहे.

सभेसाठीच्या काही अटी आणि शर्थी

सभा संध्याकाळी 5 ते रात्री 9.45 या वेळेतच घ्यावी . सभेचं ठिकाण आणि वेळेत बदल करू नये

सभेला येताना शस्त्र, तलवारी स्वत: जवळ बाळगू नये, शस्त्रांचं प्रदर्शन करू नये

सभेला येणाऱ्या लोकांनी कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी तसेच असभ्य वर्तन करू नये

सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात यावे

कार्यक्रमाच्या वेळी वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये.

स्टेज उभारण्याआधी संबंधित ठेकेदारानं स्टेज स्टॅबिलिटी प्रमाणपत्रं पोलिसांकडे सादर करावं.

सभा स्थानाच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रीत करु नये.

क्षमतेपेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून काही ढकला ढकली, अव्यवस्था, गोधळ, चेंगराचेंगरी निर्माण झाल्यास संयोजकांना जबाबदार धरले जाईल.