कराड प्रतिनिधी | सध्या देशात दलितांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. महाराष्ट्रात बरी परिस्थिती आहे मात्र उत्तर भारतात अशा हत्यांचं प्रमाण चिंताजनक आहे असं म्हणत मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि ८६ व्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी दलितांवरील अन्यायावरुन सरकारवर निशाना साधला. दलितांच्या हत्या हे सुद्धा गुजरात माॅडेलच असल्याचे मत व्यक्त करत कोतापल्ले यांनी यावेळी नरेंन्द्र मोदी यांच्या गुजरात माॅडेलवर अप्रत्यक्ष टीका केली. रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडोगोपाळा कदम उर्फ मुकादमतात्या यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जातीला वळण लावणं हे सर्वात कठीण काम आहे. मात्र कर्मवीरांनी माणसाला जातीतून बाहेर काढलं. महात्मा गांधी एकदा कर्मवीरांच्या सातारा येथील वसतीगृहात आले असता सर्व जातीधर्माची मूलं एका पंगतीत जेवत असल्याचं पाहून त्यांनी कर्मवीर आण्णांचे कौतुक केल्याचा प्रसंग यावेळी कोतापल्ले यांनी सांगितला. हे सांगत असताना अजूनही देशात खास करुन उत्तर भारतात दलितांच्या हत्या होत आहेत हे दुर्दैवी आहे असं कोतापल्ले म्हणाले.
दरम्यान शेकडो एकर जमिन रयत शिक्षण संस्थेला दान केलेल्या दानशून बंडो गोपाळा कदम यांच्या नावाने दिला जाणारा मुकादम पुरस्कार मला मिळाला याचा मला अभिमान आहे. रयत शिक्षण संस्थेने विचारी पिढी घडवण्याचे काम केले आणि आज या पुरस्कारामुळे माझा रयत शिक्षण संस्थेशी संबध जोडला गेला ही अभिमानाची गोष्ट आहे असं कोतापल्ले म्हणाले. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव आर. डी. गायकवाड, सहा. इन्स्पेक्टर मणेर, स.गा.म. काॅलेज, कराड चे प्राचार्य राजमाने तसेच मुकादम तात्या यांचे चिरंजीव विलासराव बंडोबा कदम आदी मान्यवर उपस्थिर होते.