हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागपूर हिंसाचार (Nagpur Violence) प्रकरणासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर आज पोलिसांनी मास्टरमाइंड फहीम शमीम (Faheem Shamim) खानला अटक केली आहे. 40 वर्षीय फहीमने या दंगलीत महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ज्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फहीमने नागपूर मतदारसंघातून उमेदवारीही दाखल केली होती.
पोलिसांच्या तपासानुसार, फहीम खानने नागरिकांना भडकावणारे भाषण केले होते. ज्यामुळे नागपुरात हिंसाचार निर्माण झाला. संजय बाग कॉलनीतील यशोधरा परिसरात राहणाऱ्या फहीमचे नाव याआधीही वादग्रस्त प्रकरणांमध्ये आले आहे. मात्र, मधल्या काळात राजकारणात अधिक सक्रीय झाल्यानंतर त्याने आक्रमक भूमिका घेतली.
पूर्वनियोजित कटाचा भाग
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. दंगलखोरांना एकत्र करून, शहरात अशांतता पसरवण्याची योजना आखण्यात आली होती. विशेष म्हणजे, हिंसाचाराच्या एक दिवस आधीच गणेशपेठ पोलिस ठाण्यासमोर काही लोकांनी एकत्र येऊन ‘औरंगजेब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यामुळे हा प्रकार दंगल भडकवण्याचा पहिला प्रयत्न असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हिंसाचाराचा उद्रेक
सोमवारी म्हणजेच 16 मार्च रोजी रात्री चिटणीस पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर दंगल उसळली. जमावाने अचानक पोलिसांवर दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात तब्बल 34 पोलिस कर्मचारी जखमी झाले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला.
दरम्यान, आरोपी फहीम खानसह पोलिसांकडून 51 जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस सध्या त्याच्या कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया हालचालींची तपासणी करत आहेत. महत्वाचे म्हणजे, नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितले आहे की, शहरातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने 12 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.