भाजपाचा देश विकून कारभार; नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात वाढत्या महागाईच्या मुद्यावरून राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “एकीकडे आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, मात्र दुसरीकडे देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. सध्या देश विकून भाजप कारभार करत आहे. निरव मोदी, मेहुल चोक्शी यांचे कर्ज माफ होते, मात्र नंतर त्या कर्जाची वसुली सर्वसामान्यांच्या खिशातून होते. जनतेची लूट सुरू आहे,” अशी टीका पटोलेंनी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा सुद्धा विरोधी पक्ष टिकला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, आता विरोधी पक्ष संपवून हुकूमशाही राबवली जात आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे. सध्या जनतेची जी लूट केली जात आहे. त्या विरोधात आता काँग्रेसने लढा उभारला असून, आम्ही दडपशाहीला घाबरणार नाही. देशात बेरोजगारी वाढली आहे, महागाई गगनाला भडली आहे. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग हैराण झाला आहे यासाठी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात हे आंदोलन सुरू असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापरावरून पटोलेंनी निशाणा साधला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपाने महाविकास आघाडीचे सरकार पाडले. सध्या राज्यात जे सरकार सत्तेत आले आहे ते असंवैधानिक सरकार आहे. याविरोधात आता काँग्रेस रस्त्यावर उतरले असून आम्ही जनसामान्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी पटोले यांनी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित केला. “ज्या केंद्र सरकारमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, महागाई वाढली ! त्यांच्या विरोधात कारवाई नाही. परंतु जनतेचे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर तुम्ही कारवाई करत आहात? अशा प्रश्न पटोलेंनी केला.