हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी (१० मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र, या पत्रकार परिषदेतील खुर्च्यांच्या अदलाबदली आणि एकनाथ शिंदे यांच्या विधानांवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत, शिंदे आणि पवारांना काँग्रेससोबत येण्याचे खुले आमंत्रण दिले आहे.
भाजप अजित पवार व शिंदेंना जगू देणार नाही”
धुलिवंदनाच्या निमित्ताने नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर थेट भाष्य केले. यावेळीते म्हणाले की, “भाजप त्यांना टिकू देणार नाही. शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना संरक्षण काढून घेतले जात आहे, तर भाजपच्या नेत्यांची सुरक्षा कायम आहे. भाजप त्यांच्या योजना बंद करत आहे. अजित पवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा त्यांच्या मनातील नाही, तर भाजपने लादलेला आहे. त्यामुळे तेही नाराज आहेत”
“काँग्रेससोबत या, आम्ही मुख्यमंत्री बनवू”
महत्वाचे म्हणजे यावेळी बोलताना त्यांनी शिंदे आणि अजित पवार यांना थेट काँग्रेससोबत येण्याची ऑफर दिली. ते म्हणाले की, “अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये न्याय आणि स्थान मिळणार नाही. आमच्याकडे या, आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ. काही दिवस अजित पवार आणि काही दिवस एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवू. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत, त्यांची संपूर्ण काळजी घेऊ.” नाना पटोले यांच्या याच विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
इतकेच नव्हे तर नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका करत म्हणले की, “फडणवीस आजकाल खूप फेकतात, त्यांनी मोदींसारखं खोटं बोलू नये. आधीचे फडणवीस वेगळे होते, ते राज्यासाठी लढायचे, आता त्यांनी तसंच करावं,” तसेच, “महाराष्ट्राला अति विद्वान नेते लाभले आहेत. ते वेगवान आहेत.” असे भाष्य करत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
दरम्यान, नाना पटोले यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजूनही भाजपच्या एकाही नेत्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. महत्वाचे म्हणजे, यासगळ्यात शिंदे आणि अजित पवार यांची भूमिका काय राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.