देगलूर ते भोकर…. विधानसभेला नांदेडमध्ये अशोक चव्हाण निर्णायक ठरतील?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड (Nanaded) म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचं नाव… कॉंग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्याने जिल्ह्यात काँग्रेसचा बुरुज ढासळणार, असा सगळ्यांचाच समज झाला होता.. पण लोकसभेचा निकाल लागला आणि अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपचा बुरुज ढासळला.. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठिशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला… आणि कॉंग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी आश्चर्यकारकरित्या लोकसभा जिंकली..अशोक चव्हाण हा आपला म्होरक्याच भाजपात गेल्याने मरगळ आलेल्या पक्षाला लोकसभेतील विजयानं नव्यानं बळ मिळालंय.. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र असेल? नांदेड जिल्ह्यात सध्याचं वारं पाहता नेमके कोणते ९ चेहरे आमदारकी खेचून आणतील? विधानसभेला जिल्ह्यात कॉंग्रेस की भाजप भाव खाऊन जाणार? त्याचाच घेतलेला हा इनडेप्थ आढावा…

जिल्ह्यातला पहिला मतदारसंघ येतो तो नांदेड उत्तरचा.. .. शिवसेना शिंदे गटात असणारे बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार… 2019 ला काँग्रेसचे प्रस्थापित डी. पी. सावंत यांचा पराभव करून अगदी तरुण, नवख्या शिवसैनिकावर शिवसेनेनं विश्वास ठेवून, भाजपच्या इच्छुकांचा दबाव झुगारून कल्याणकर यांना उमेदवारी मिळवून दिली… सलग दोन टर्म आमदार राहीलेल्या काँग्रेसच्या सावंतांचा पराभव करत कल्याणकर जायंट किलर ठरले होते… वंचित आणि एमआयएमचाही मतदारसंघात प्रभाव असल्याने इथे मतविभाजनाचा फटका सावंतांना बसल्याचं बोललं गेलं… त्यात अशोक चव्हाणांचे मित्र एवढीच काय ती त्यांची राजकीय ओळख मर्यादीत राहील्याने चव्हाणांच्या पाठोपाठ सावंतही भाजपात गेलेत.. तर दुसरीकडं ज्या विद्यमान आमदार कल्याणकर यांच्यावर ठाकरेंनी विश्वास टाकला होता, तेच शिंदेंच्या बंडात पहिल्या फळीत असल्याने मतदारसंघातील शिनसैनिक चांगलेच नाराज असल्याचं पाहायला मिळालं.

YouTube video player

पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आनंद जाधव यांनी केला होता. कोणत्याही आमदाराला एक कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला नव्हता. त्यामुळे हा गद्दारीचा टॅग येणाऱ्या विधानसभेला बॅकफुटला घेऊन जाणारा आहे.. . या मतदारसंघात दलीत, मुस्लीम निर्णायक संख्येने आहेत. नव्यानं वाढणारं शहर म्हणून या मतदारसंघाकड पाहीलं जातं. मात्र पाणीटंचाई आणि रस्त्यांची चाळण होऊनही विद्यमान आमदारांना या प्रश्नावर फारसं काही करता आलेलं नाहीये. थोडक्यात या नाराजीचा फटका त्यांना बसणार हे कन्फर्म आहे. त्यात महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी जास्त झाल्याने तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष मतदानापर्यंत महायुतीमध्ये राजकारण बघायला मिळू शकतं.. बाकी आघाडीत ही जागा काँग्रेसलाच सुटण्याचे चान्सेस अधिक आहेत.. त्यात लोकसभेतील यश, दलित आणि मुस्लिम मतांचा मिळणारा पाठींबा यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात प्लसमध्ये राहते.. त्यात ठाकरे गट इथं काय भुमिका घेतो, यावर इथलं बरंच समीकरण अवलंबून असणार आहे….

दुसरा मतदारसंघ येतो तो दक्षिण नांदेड विधानसभेचा… नांदेड दक्षीण म्हणजे अर्ध नांदेड शहर, सिडको – हडको आणि सोनखेडचा काही भाग मिळून बनलेला मतदारसंघ… काँग्रेसचे मोहन हंबर्डे या मतदारसंघातील विद्यमान आमदार. 2009 ला काँग्रेसकडुन ओमप्रकाश पोकर्णा यांनी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांचा पराभव केला होता. पण २०१४ ला थोड्या लीडने का होईना हेमंत पाटील यांनी ही जागा जिंकली. पण २०१९ ला पाटलांनी हिंगोलीची खासदारकी जिंकल्याने त्यांनी दक्षीण नांदेड मधून आपल्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणुक रिंगणात उतरवलं… पण बाजी मारली ती हंबर्डे यांनी.. तेव्हा भाजपतील नाराजी आणि बंडाळीचा फटका सध्याच्या काँग्रेसच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडल्याचं बोललं गेलं.. यानंतर हेमंत पाटलांचं Hemant Patil Sad तिकीट कापणं, राजश्री पाटील ( Rajshree Patil Lok Sabha Prachar ) यांची यवतमाळ लोकसभेची अपयशी लढत यामुळे शिंदे गटात असणारे पाटील बॅकफूटला गेले आहेत. पण तरिही लोकसभेतून माघार घेणं मान्य केल्यामुळे ते महायुतीचे दक्षीण नांदेडचे उमेदवार असतील, असं बोललं जातंय.. तर दुसरीकडे स्टँडिंग आमदार हंबर्डेच पुन्हा या मतदारसंघातून आघाडीकडून लढत देतील, अशी चिन्हं आहेत. त्यामुळे मतदान घासून होणार असलं तरी निकालात आघाडीच्या उमेदवाराला सध्यातरी एक गुण जादा मिळतोय… अशोक चव्हाण भाजपात गेल्यावर याच हंबर्डे यांनी नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं कॉन्फिडन्सली सांगून आमदारकीला फक्त आपूणच, हे ठणकावून सांगितलंय…,

तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे कंधार विधानसभा…एकेकाळी विधानभवन गाजवून सोडणारे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख होती… प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली राजकीय पाळंमूळं याच मतदारसंघात घट्ट रोवली… २००४, २०१४ अशा दोन टर्म प्रताप पाटलांनी कंधार मधून निकाली काढत आमदारकीचा गुलाल उधळला. पण २०१९ ला प्रताप पाटील चिखलीकर लातूरमधून खासदार झाल्याने कंधारच्या जागेवर अनेक इच्छुकांचा डोळा गेला. त्यात कंधारचं तिकीट आपल्या मुलाला सोडण्यात यावं, यासाठी चिखलीकरांनी बरेच प्रयत्न केले. पण युती असल्यानं ही जागा शिवसेनेच्या ॲड. मुक्तेश्वर धोंडगे यांनाच सोडण्यात आली. मुक्तेश्वर धोंडगे व श्यामसुंदर शिंदे Vs यांच्यात इथं २०१९ ला मुख्य लढत झाली. चिखलीकरांचे वर्चस्व असल्याने त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील व मेहुणे शामसुंदर शिंदे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. यावरून नंतर शिंदे व चिखलीकर यांच्यात बराच वाद झाला… यातून शिंदे यांनी शेकापची उमेदवारी मिळवली. आणि शिंदे शेकापकडून विजयी झाले… सध्या २०२४ विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात इच्छुकांची यादी फार मोठी आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील, पुरुषोत्तम धोंडगे, दिलीप धोंडगे हे सध्या उमेदवारीच्या रेसमध्ये दिसतायत. त्यात प्रा. मनोहर धोंडे मतदारसंघात काय भुमिका घेणार? यावरही इथली बरीच समीकरण अवलंबून आहेत…

आता पाहुयात मुखेड विधानसभा मतदारसंघाबद्धल… गावची गाव भकास झालेली पाहायची असतील, तर मुखेडला या… अशी या मतदारसंघाची अवस्था… स्थलांतराचा मोठा प्रश्न, पाणीचंटाई, ना कुठला रोजगार ना.. ना कुठलं धरण.. भाजपचे तुषार राठोड इथले विद्यमान आमदार. खरंतर त्यांचे वडील गोविंदमामा राठोड हे २०१४ ला इथून निवडून आले. पण शपथविधी आटोपण्याच्या आधीच लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र तुषार राठोड विजयी झाले… पुढे २०१९ लाही त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला… मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष, विकासकामांची वाणवा आणि लेंडी प्रकल्पाची झालेली वाताहत पाहता यंदा जनता तुषार राठोडांना दणका देण्याच्या तयारीत आहे. पारंपरिक विरोधक भाऊसाहेब पाटील यांचे निधन झाल्यामुळे हनुमंत पाटील हे निवडणुक मैदानात दिसण्याचे फुल टू स्कोप आहे… लिंगायत, बंजारा आणि इतर समाज कुणाच्या पाठीशी उभा राहतो, यावर इथला निकाल अवलंबून आहे..

पाचवा मतदारसंघ आहे तो देगलूरचा… अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रसचे जितेश आंतापुरकर विद्यमान आमदार आहेत… खरं म्हणजे 2019 ला रावसाहेब अंतापुरकर हे काँग्रेसकडून निवडून आले होते. मात्र कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे सुपुत्र जितेश आंतापुरकर निवडून आले.. अशोक चव्हाण सध्या भाजपात गेल्याने देगलूरमध्ये काही प्रमाणात काँग्रेसला लॉस होऊ शकतो… त्यात विद्यमान आमदारांना कुठल्या पक्षाकडून निवडणुक लढवायची, हा प्रश्न पडलेला असणार.. त्यात सुभाष साबणे यांनी पोटनिवडणुकीला शिवसेना सोडून भाजपची धरलेली वाट पाहता, ते टेक्निकली भाजपात असले तरी शिंदेंच्या अत्यंत जवळचे त्यांना मानलं जातं. त्यामुळे साबणे पोटमिवडणुकीतील पराभवाचा वचपा आत्ता काढणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

सहावा मतदारसंघ येतो तो नायगावचा… नांदेडमध्ये सध्या भाजपला दणका देत खासदार झालेले वसंत चव्हाण यांची पाळंमुळं याच नायगावमध्ये राेवली गेली. २००९ आणि २०१४ मध्ये सलग त्यांनी दोनदा आमदारकी पदरात पाडून घेतली. सोबतच बरीच विकासकामंही नेटाने केली. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्धल एक सॉफ्ट कॉर्नर राहीला… पण भाजप लाट, पण आघाडीत असणारी धुसपूस आणि युतीनं एकदिलाने लढलेली निवडणुक यामुळे चव्हाणांना भाजपच्या राजेश पवारांनी पराभवाचा दणका दिला.. पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालातून वसंत चव्हाण यांनी थेट दिल्ली गाठत जिल्ह्यातील वारं फिरलंय. हे दाखवून दिलंय.. त्यामुले येत्या विधानसभेला ते नायगावमधून आपल्या मुलाच्या तिकीटासाठी शब्द टाकू शकतात.. तर दुसरीकडे भाजपचे राजेश पवार हेच महायुतीचे उमेदवार असतील, असं सध्या तरी चित्र आहे… त्यात भास्करराव खतगावकर, गंगाधर कुंटूरकर व बापूसाहेब गोरठेकर या तिघांची भूमिका काय राहील, यावरही इथला निकाल प्रभावित राहणार आहे.. फक्त यंदाही नायगावमध्ये आमदारकीसाठी काटे की टक्कर पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की…

सातवा आहे भोकर विधानसभा.. स्वर्गीय शंकरराव चह्वाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख.. बाच वारसा त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाणांनी पुढे कायम ठेवला. २०१४ ला त्यांची लोकसभेवर निवड झाल्यानं त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या आमदार झाल्या.. खासदार आणि आमदार एकाच घरात असूनही अशोक चव्हाणांना आपल्या मतदारसंघाचा म्हणावा असा विकास करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पक्षाच्या कामात ते इतके व्यस्त झाले की जिल्ह्याकडे, मतदारसंघाकडं त्यांचं दुर्लक्ष झालं… या मधल्या काळात इथे बरेच स्वयंघोषित नेते उदयास आले. याचा मोठा लॉस म्हणजे २०१९ च्या लोकसभेला दस्तुरखुद्द चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला.. आता वंचित आणि इतर फॅक्टर इथे वर्क आउट झाले, हा भाग आहेच.. पण तरिही या पराभवानं चव्हाणांना मोठा धक्का बसला.. पुढे भोकर विधानसभेला त्यांनी भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उभं केलं. चव्हाण व गोरठेकर यांच्यात थेट लढत झाली. त्यात अशोक चव्हाण यांनी बाजी मारली.. पण त्यांच्या लीडने बराच मार खाल्ला… पुढे त्यांंच्यामागे लागलेला चौकशींचा ससेमीरा.. भाजपातील प्रवेश BJP Pravesh Ashok Chavhan.. मिळवलेली राज्यसभा… हा सगळा सिक्वेन्स पाहता भोकरचं राजकारण चांगलंच गुंतागुंतीचं बनून गेलंय.. उमेदवारांची इथेही भाऊगर्दी असली तरी महायुती प्लसमध्ये राहील, असं सध्याचं चित्र सांगतं.. पण नाराज काँग्रेस कार्यकर्ते काय भुमिका घेतील, यावर इथला निकाल अवलंबून राहील…

आता पाहूयात आठव्या हदगाव विधानसभा मतदारसंघाबद्धल… 2014 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसकडुन हा मतदारसंघ हिसकाऊन घेतला… शिवसेनेच्या नागेश पाटील आष्ठीकर यांनी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील यांना पराभवाचा दणका दिला.. २०२४ लाही सेमच लढत हदगावला पहायला मिळाली पण यावेळेस माधवराव पाटील आमदार झाले… नागेश पाटील आष्टीकरांनी Nagesh Patil Ashtikar Win मशालीच्या चिन्हावर हिंगोलीत खासदारकीचा गुलाल उधळल्याने माधवराव पाटीलच इथून काँग्रेसच्या पंजावर निवडणुक लढताना दिसतील… पण ठाकरे गट इथे काय भुमिका घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…

शेवटचा मतदारसंघ आहे किनवटचा… नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदीवासी आणि बंजारा बहुल मतदारसंघ म्हणून किनवटची ओळख आहे. या मतदारसंघात सातत्याने तीन वेळा निवडुन येण्याचा विक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईक यांनी केलाय. या तीन्ही वेळेच्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांची माजी आमदार भिमराव केराम यांच्याशी जोरदार लढाई झाली. मात्र सातत्याने तिन्ही वेळा भिमराव केराम हे क्रमांक दोनचे मते घेत राहीली आणि प्रदीप नाईक निवडुन येत राहीले. पण हा सीलसीला मोडीत निघाला तो २०१९ ला भाजपच्या भीमराव केराम यांनी अखेर प्रदीप नाईक यांचा पराभव केलाच. जवळपास साठ टक्क्यांवर असलेला बंजारा मतदार नाईक यांच्या मागे तर आदिवासी मतदार केराम यांच्या मागे असं इथल्या मतदारांचं सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचं बघायला मिळतं.. सध्या प्रदीप नाईक यांच्या बद्धल असणारी नाराजी तर केराम यांची अकार्यक्षमता यामुळे इथे सध्या राजकीय असंदिग्धता आहे… इथे दोन्हीही बाजूने उमेदवार देताना या सामाजिक परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे, एवढं मात्र नक्की..बाकी नांदेडच्या या नऊ मतदारसंघात आमदारकीचा गुलाल कोण उधळेल? अशोक चव्हाणांच्या जाण्याने जिल्ह्यातून काँग्रेस बॅकफूटला फेकली जाईल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.