हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षानं इंगा दाखवला आणि सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या भुजबळ साहेबांच्या चिरंजीवांना पराभवाचा धक्का बसला… हे घडलं होतं नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघात… आणि यामागचे कलाकार होते विद्यमान आमदार सुहास कांदे… भुजबळ गटाला धक्का देत खरंतर निवडणूक जिंकणं हा त्यातल्या त्यात एक पराक्रम होता… यानंतर भुजबळ आणि कांदे यांच्यातला राजकीय विस्तव अनेकदा पाहायला मिळाला… शाब्दिक चकमकी झाल्या… अरे तुरे ची भाषा झाली…. 2024 ला काहीही झालं तरी कांदेंना रडवायचंच यासाठी भुजबळ पिता पुत्रांनी सारी फिल्डिंग लावलेली असताना… येवल्यात वडिलांची तर नांदगावात मुलाची प्रतिष्ठा पणाला लागलीय… पण दुसऱ्या बाजूला कांदेंनी शिवसेनेच्या बंडात साथ दिल्याने त्यांच्याबद्दल नाराजी आहेच… त्यामुळे कांदे आणि भुजबळांच्या भांडणात नांदगाव विधानसभेचा आमदार तिसराच होतोय, अशी परिस्थिती सध्या मतदारसंघात आहे…
महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स मधले बिग बी छगन भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या सलग दोन टर्मच्या विजयाला ब्रेक लावत शिवसेनेचे सुभाष कांदे जायंट किलर ठरले… आणि नांदगावची आमदारकी राष्ट्रवादीकडून काढून घेत मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला…… छगन भुजबळांचं वलय असतानाही पंकज भुजबळ यांचा पराभव हा नक्कीच जिव्हारी लागणारा होता…यानंतर सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद तर उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे…पण असं असतानाही शिंदे आणि अजित पवार एकाच गटात आल्यामुळे आता नांदगावचा महायुतीचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्न आहे… छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे या जागेसाठी मोठा रस्सीखेच करू शकतात… पण स्टॅंडिंग आमदारांनाच तिकीट द्यायचं असा फॉर्मुला ठरला तर इथल्या निवडणुकीत पाडापाडीचा कार्यक्रम होऊ शकतो… त्यामुळे नांदगाव मनमाडच्या जागेवरूनच भुजबळ आणि कांदे यांच्यात येणाऱ्या काही दिवसात पुन्हा एकदा राजकीय विस्तव पाहायला मिळेल… तसं नांदगाव मनमाड या विधानसभा मतदारसंघाचा इतिहासही बराचसा बदलता आणि इंटरेस्टिंग आहे…
स्वातंत्र्यानंतर सलग सहा वेळा येथून कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रतिनिधित्व केल्याने पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ 1990 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी आपल्याकडे खेचत आमदारकी मिळवली. मात्र 1995 ला युतीच्या लाटेत शिवसेनेने हा मतदार संघ आपल्याकडे खेचत प्रथमच राजेंद्र देशमुख शिवसेना-भाजपा युतीचे आमदार झाले. 2004 पर्यंत हा मतदार संघ युतीच्या ताब्यात राहिला. त्यानंतर पुन्हा कॉंग्रेसचे अनिल आहेर यांनी शिवसेनेच्या ताब्यातून हा मतदार संघ आपल्याकडे खेचून आणला. 2009 मध्ये मात्र नांदगाव मतदार संघात वेगळाच भूकंप झाला आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मतदार संघाची अदलाबदल होऊन हा मतदार संघ राष्ट्रवादीने आपल्याकडे मागवून घेत येथून पंकज भुजबळ यांना उमेदवारी दिली… बाहेरचे असूनही या मतदार संघातील जनतेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले…. नांदगाव-मनमाड मतदार संघात एकदा निवडून दिलेले आमदार पुन्हा निवडून येत नसल्याचा इतिहास पाहता 2014 मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेने मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी जिवतोडून प्रयत्न केले. त्याचवेळी शिवसेना-भाजपाची युती होऊ न शकल्याने भाजपने आपला उमेदवार या मतदार संघात उभा केला. तिरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या पंकज भुजबळ यांनी बाजी मारत सलग दुसऱ्यांदा आमदारकीचा मान मिळविला आणि एकदा आमदार झाल्याने दुसऱ्यांदा पुन्हा आमदार रिपीट होत नसल्याच्या दावा फेल ठरला… 2009 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या येवला मतदार संघात विकास काम करुन मतदार संघाचा चेहरा बदलला. त्यामुळे नांदगाव खुंटलेला विकास वडिलांच्या पायावर पाय ठेवून पंकज भुजबळ दूर करतील आणि चांगला विकास होईल या आशेवर मतदारांनी त्यांना दोनदा संधी दिली…
पण भुजबळ सुपुत्रांनी विकासाकडे… तर मतदारांनी मताकडे पाठ फिरवली… आणि 2019 ला सारी ताकद पणाला लावूनही पंकज भुजबळ यांचा मानहानीकारक पराभव झाला… खरंतर 2016 मध्ये छगन भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर अडीच वर्षांनी त्यांची सुटका झाली या काळात आमदार पंकज भुजबळांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष झाले. सोबत असलेल्या अनेक दिग्गजांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीची ताकद कमी झाली आणि नगरपरिषद निवडणुकीत मनमाडसह नांदगाव नगरपालिका या शिवसेनेच्या ताब्यात गेल्या तर पंचायत समिती झेडपीमध्येही शिवसेनेने बाजी मारली. त्यामुळे पुन्हा एकदा नांदगाव-मनमाड मतदार संघात शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाले…. 2019 च्या निवडणुकीच्या आधीच नांदगाव मध्ये अशी परिस्थिती होती, की अगदी डोळे झाकूनही शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल… झालंही तसंच आघाडी कडून पंकज भुजबळ यांच्या विरोधात युतीने शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्यावर विश्वास टाकला… आणि कांदे जायंट किलर ठरत निवडून आले…
यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर सत्तेतील छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात झालेली टोकाची भांडण आणि त्याचे मुख्यमंत्री शिंदेंकडून विधानसभेत उमटलेले पडसाद आपण पाहिले असतीलच… महाविकास आघाडीत असताना कांदे आणि भुजबळ यांच्यात खटके उडाले… त्यात भुजबळांचं राजकीय वजन पाहता ते आपल्या मुलाला काहीही केल्या तिकीट मिळवून देणार, याची खात्री कदाचित कांदेंना असावी… म्हणूनच शिवसेना फुटीनंतर कांदे सेफ झोन म्हणून शिंदें सोबत आले… पण ड्रामा अजून बाकी होता… अजितदादा महायुतीत येताना भुजबळांना सोबत घेऊन आले… त्यामुळे आता महायुतीत भुजबळ आणि कांदे यांच्या तिकीट वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळेल, एवढं मात्र नक्की…
तर दुसऱ्या बाजूला मेरिटनुसार महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला सुटणं संयुक्तिक असताना काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे… नांदगाव हा आपला पारंपारिक मतदारसंघ असून काहीही केल्या तो लढवणारच! असा जणू प्रणच काँग्रेसचे माजी आमदार अनिल आहेर यांनी केल्याने ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातही तिकीट वाटपाचा तिढा पाहायला मिळू शकतो… ज्याचा आमदार तो उमेदवार… असा फॉर्म्युला ठरला तर सुहास कांदेंची आमदारकी फिक्स समजली जातेय… पण या सगळ्यात समीर भुजबळ नेमकी काय भूमिका घेणार? ते पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे… पण नांदगाव मनमाडची निवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना या लाईन अपने चालली, तर निकाल अनपेक्षित वळणावर जाऊन पोहोचेल, एवढं मात्र नक्की….