नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा; कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राणेंनी स्वतःच बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात केली.

नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या आठ मजली ‘अधीश’ बंगल्यात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना या बांधकामाबद्दल नोटीस बजावली होती. तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी २१ फेब्रुवारी रोजी ‘अधीश’ बंगल्याची पाहणी केली होती. पाहणी करत असताना या बंगल्यामध्ये अंतर्गत फेरबदल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं होतं. त्यानंतर इमारतीचा आराखडा आणि प्रत्यक्ष बांधकामाची पडताळणी करण्यात आली व बांधकाम अनधिकृत आहे यावर शिक्कामोर्तब झालं.

या प्रकरणी राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही राणेंना दणका देत अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम दोन आठवड्यात तोडण्याचे आदेश दिले तसेच याप्रकरणी राणे यांना 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर आज राणे कुटुंबीयांनी अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पडण्यास सुरुवात केली आहे. राणे कुटुंबीयांनी हे बांधकाम पाडल्यानंतर महापालिका पुन्हा पाहणी करेल.