शाळेत असताना शिक्षक माझ्याकडून गणिताचा नवीन संग्रह जाणून घ्यायचे अन् मग सर्वांना शिकवायचे – राणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाळेत असताना मी टॉपर होतो. माझ्या गणितच्या शिक्षिका घरी बोलावून गणिताचा नवीन संग्रह माझ्याकडून जाणून घेत होत्या आणि नंतर तो धडा सर्वाना शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन स्टेप सर्वांच्या पुढे असायचो असं म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी जागवल्या. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.

राणे म्हणाले, मी गणित विषयात टॉपर होतो. प्राथमिक शाळेत पाचवी-सहावीत असताना गणिताचा नवीन संग्रह केला होता. आमच्या गणिताच्या शिक्षिका मला घरी बोलवायच्या आणि माझ्याकडून गणिताचा नवीन संग्रह जाणून घ्यायच्या. त्यानंतर तो धडा विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन पावले सर्वांपुढे असायचो. बुद्धिमत्ता, नशीब आणि वैचारिक ताकद यामुळे मी मोठा झालो. मी अजूनही स्वतःमधील विद्यार्थी मरु दिला नाही. मी चांगल्या माणसांकडून शिकत शिकत गेलो असेही राणे म्हणाले.

माझ्या संपूर्ण यशात बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे. बाळासाहेबांनीच मला घडवले आहे. त्यांनीच मला परिपक्व बनवले आणि म्हणून उद्योग-व्यवसायात आणि राजकारणात मी यशस्वी ठरलो असं सांगायला सुद्धा राणे विसरले नाहीत. तसेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि परिश्रम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असा सल्लाही नारायण राणे यांनी विद्यार्थ्यांना दिला .