मनोज जरांगेंच्या डोक्यावर परिणाम; एकेरी भाषेत राणेंची विखारी टिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अंतरवली सराटी इथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांना सलाईन लावण्यात आले आहे. याच दरम्यान, जरांगे यांनी मोदींवर निशाणा साधताना म्हंटल होत कि, मोदींच्या सभा आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही. यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला आहे. जरांगे पाटलांच्या डोक्यावर परिणाम झाला असून आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत अशी विखारी टीका नारायण राणे यांनी केली.

याबाबत नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटल, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत .

जरांगे सलाईनवर-

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील १० फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत . आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे, तसेच त्याच्या पोटातही दुखू लागलं आहे. सुरुवातीला जरांगे यांनी उपचाराला नकार दिला, मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली. सध्या जरांगे पाटलांना डॉक्टरांनी सलाईन लावलं असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव अंतरावली सराटीकडे येत आहेत.