हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nashik Akkalkot Expressway । उत्तर महाराष्ट्रतुन अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकासांठी आनंदाची बातमी आहे. लवकरच नाशिक ते अक्कलकोट एक्सप्रेसवे तयार होणार आहे. वास्तविक केंद्र सरकारने हा प्रकल्प बीओटी तत्वावर उभारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. म्हणजेच बांधा वापरा हस्तांतरित करा … सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे च्या अंतर्गत नाशिक ते अक्कलकोट महामार्ग तयार केला जाणार आहे. जवळपास ३७४ किलोमीटर अंतराचा हा प्रकल्प प्रवाशांचा निम्मा वेळ वाचवेळ. सध्या नाशिकहून अक्कलकोटला जाण्यासाठी ९ तास लागतात, परंतु आता नव्या महामार्गानंतर हेच अंतर ४ तासांवर येईल.
खरं तर सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे चे दोन भाग करण्यात आले आहेत. या मार्गाचे सुरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई असे दोन महत्त्वाच्या टप्पे करण्यात आले आहेत. यातही काही टप्पे आहेत. त्यातील नाशिक ते अक्कलकोट महामार्ग (Nashik Akkalkot Expressway) २ टप्प्यात बांधला जाईल. त्यातील पहिला टप्पा म्हणजे नाशिक ते अहिल्यानगर आणि दुसरा टप्पा म्हणजे अहिल्यानगर ते अक्कलकोट… यातील नाशिक ते अहिल्यानगर हा प्रवास १५२ किलोमीटर आहे तर अहिल्यानगर ते अक्कलकोट हा महामार्ग २२२ किलोमीटर असेल. म्हणजेच हा एकूण प्रवास हा ३७४ किलोमीटर अंतराचा असेल. बीओटी तत्वावर हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार असल्याने यामुळे सरकारचा मोठा खर्च वाचणार आहे . तसेच या नव्या निर्णयामुळे या प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण होईल अशी आशा आहे.
कसा आहे प्रकल्प? Nashik Akkalkot Expressway
सुरत – चेन्नई ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे. या महामार्गाची लांबी 1271 किलोमीटर इतकी आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातून जाईल. महारष्ट्राबाबत सांगायचं झाल्यास, राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव अन सोलापूर या शहरातून हा एक्सप्रेसवे जाईल. सहा मार्गिकेचा हा महामार्ग प्रवाशांचा प्रवास सोप्पा आणि समृद्ध करेल. सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून नाशिक ते अक्कलकोट या टप्प्यासाठी हायब्रिड अॅन्युइटी माॅडेलनुसार निविदा जारी करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव हे निविदा प्रक्रिया रद्द झाली. त्यानंतर काही तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे हा प्रकल्प बीओटी तत्वावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एनएचएआयच्या सार्वजनिक- खासगी भागीदारी मूल्यांकन समितीने नुकतीच नाशिक-अक्कलकोट महामार्गाला मान्यता दिल्याची माहिती एनएचएआयच्या नाशिकमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.




