हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nashik Kumbh Mela । आगामी २०२७ नाशिक कुंभमेळ्यासाठी सरकार कडून जोरदार प्लॅन सुरु आहे. १२ वर्षातून एकदा येणाऱ्या या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर नाशिकला येणाऱ्या भाविकांना आरामदायी प्रवास करता यावा, नाशिककडे येत असताना प्रवासाचा त्रास होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारने मंदिर नगरीकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांची व्यापक दुरुस्ती करण्याची घोषणा केली आहे. नागपूरमध्ये झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली.
आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Nashik Kumbh Mela) सुरुवात त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील रामकुंड येथील पारंपारिक ध्वजारोहणाने होईल. जुलै २०२८ पर्यंत हा कार्यक्रम जवळजवळ दोन वर्षे चालेल. लाखो भाविकांचा ओघ पाहता, पायाभूत सुविधांची तयारी सरकारसाठी मोठं आव्हान असणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रमुख रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
कोणकोणत्या रस्त्यांची दुरुस्ती होणार? Nashik Kumbh Mela
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, नाशिक जिल्हा हा मुंबई, पुणे, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि शेजारील गुजरात मधील महामार्गानी जोडलेलं आहे. जेव्हा भाविक देशभरातून नाशिकला कुंभमेळ्यासाठी येतील तेव्हा ही शहरे नाशिककडे जाणारी प्रवेशद्वार असतील. त्यामुळे या शहरांतून नाशिकला जोडणारे महामार्ग जड वाहतुकीचा भार सहन करू शकतील याची खात्री सरकार कडून केली जाईल. राष्ट्रीय महामार्गांशी थेट जोडणाऱ्या रस्त्यांची स्थिती सरकार तपासून बघेल.
तसेच सरकारने नाशिक रिंग रोड प्रकल्पाला मान्यता दिली आहे. शहराची गर्दी कमी करण्यासाठी हा प्रोजेक्ट गेमचेंजर ठरेल. रिंग रोड प्रकल्पामुळे मध्य नाशिकपासून जड आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीला वळवण्यास मदत होईल, ज्यामुळे कुंभमेळ्याच्या दिवसांमध्ये होणारे अडथळे कमी होतील. अजून एक सर्वात महत्वाचा रस्ता म्हणजे नाशिक ते त्र्यंबकेश्वर …. प्रमुख स्नानस्थळांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचे ६ पदरी करण्याचे सरकारचे नियोजन आहे. यामुळे भाविकांना आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येईल आणि त्यांचा प्रवासाचा वेळही वाचेल.
या मार्गांचा होणार विकास
१) घोटी-पाहिने -त्रिंबकेश्वर-जव्हार फाटा
२) द्वारका सर्कल-सिन्नर आयसी २१ (समृद्धी एक्सप्रेसवे) नांदूर शिंगोटे – कोल्हार
३) नाशिक ते कसारा
४) सावली विहीर (आय सी २० समृद्धी एक्सप्रेसवे) शिर्डी – शनिशिंगणापूर फाटा ( राहुरी खुर्द)
५) नाशिक ते धुळे
६) त्र्यंबकेश्वर-जव्हार-मनोर
७) सावली विहीर-मनमाड-मालेगाव
८) घोटी-सिन्नर-वावी-शिर्डी




