गोडसे, भुजबळ की तिसराच कोणी? नाशिकबाबत महायुतीचे अद्याप ठरेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्त्वाचा असलेल्या नाशिक लोकसभा मतदार संघाच्या (Nashik Lok Sabha Election 2024) वागावाटपाचा तिढा महायुतीकडून अजून सुटलेला नाही. एकीकडे एकनाथ शिंदे गटात असलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) हे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत, मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाशिकच्या जागेसाठी असून बसली आहे. जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) याना नाशिक मधून उतरवण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशावेळी महायुती तिकीट कोणाला देणार?? गोडसे, भुजबळ की तिसराच कोणी? भाजप पुन्हा नाशिक साठी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरणार ?? नाशिकचे राजकारण नेमकं राहील तरी कसे ते आज आपण अजनून घेऊयात…

नाशिकच्या राजकारणाचा भला मोठा इतिहास आहे आणि त्याचे काही विशिष्ट पॅटर्नही! महाराष्ट्राच्या राजकारणातील सोनेरी पान यशवंतराव चव्हाणांनीही याच नाशकातून खासदारकी मिळवली. त्यामुळे नाशिक तसा सर्वपक्षीय नेत्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय. हे सगळं खरं असलं तरी नाशिककरांनी कधीच एका व्यक्तीला किंवा पक्षाला सलग दोन टर्म निवडून दिलं नाही हो त्यांची खासियत! त्यामुळे मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी आलटून पालटून खासदारकी मिळवली. मात्र 2014 मध्ये मोदी लाट आल्यापासून सलग दोन टर्म शिवसेनेचे हेमंत गोडसे या मतदारसंघातून निवडून आले आणि नाशिकची ही परंपरा ब्रेक झाली.

गोडसे, भुजबळ की तिसऱ्यालाच लॉटरी? Nashik लोकसभेसाठी नक्की कुणाला उमेदवारी?

2014 ची निवडणूक नाशिकमध्ये अटीतटीची झाली. राजकारणात मुरलेले राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यातील ही दुहेरी लढत. 2009 मध्ये समीर भुजबळ खासदार असल्यानं आपण या निवडणुकीत आरामशीर निवडून येऊ असा एकंदरीत भुजबळांचा अंदाज होता. मात्र मोदी लाटेचा प्रभाव आणि शिवसेनेला मिळालेली भाजपची साथ यामुळे कडवे समजले जाणारे भुजबळ तब्बल 1 लाख 87 हजार मतांनी पडले. हा पराभव भुजबळांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

म्हणून 2019 च्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना काही केल्या घरी बसवायचंच या एकाच ध्येयानं छगन भुजबळ यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी केली. याही वर्षी राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल. हे जवळपास कन्फर्म झालेलं असताना भुजबळांनी ऐनवेळी 2009 चे खासदार आणि पुतणे समीर भुजबळ यांचं नाव पुढे केलं.आणि त्यांना निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडलं. यावेळेस नाशिकच्या राजकारणात बऱ्याच उलथापालतीही झाल्या. हेमंत गोडसे यांना युतीकडून तिकीट मिळल्याने भाजपात असलेले माणिकराव कोकाटे हे नाराज झाले आणि त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला. तिकडे वंचित आघाडीच्या पवन पवार यांनीही प्रचारात रंगत आणली. त्यामुळे सुरुवातीला दुहेरी वाटणारी ही निवडणूक अखेरीस चौरंगी झाली. कोकाटे गोडसे यांना फटका देणार असाही एक कयास होता. त्यात नाशकात एकच उमेदवार सलग निवडून येण्याची परंपराही नव्हती…आणि शेवटी निकाल लागला. आणि शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी इतिहास रचत नाशिक मधून सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मान पटकावला…

या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना 5 लाख 63 हजार 599, राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांना 2 लाख 71 हजार 395, अपक्ष उभे राहिलेल्या ॲड. माणिकराव कोकाटे यांना 1 लाख 34 हजार 527 तर वंचितच्या पवन पवार यांना 1 लाख 9 हजार 981 मते मिळाली. यावरून हे लक्षात येतं की 2019 ची निवडणूक चांगलीच घासून झाली. प्रत्येक उमेदवारानं लाखाहून अधिकची मत घेतली. आता यात कोकाटे आणि पवार यांनी नक्की कुणाची मतं खाल्ली? हा नव्या संशोधनाचा विषय. मात्र यामुळे समीर भुजबळ यांना नक्कीच फटका बसला एवढं मात्र नक्की!

गोडसेंच्या खासदारकीला एक दशक पूर्ण होत असताना आता 2024 ची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीये. मात्र यावेळेस राजकीय पक्षांची बरीच फाटाफूट आहे. त्यामुळे तिकीट कुणाला मिळणार? आणि उमेदवार कोण असणार? यासारख्या गुंतागुंतीच्या कामानं हाय कमांडचंही डोकं गरगरत असावं. नाशिक पुरता विचार करायचा झाला तर महायुतीकडून ही जागा हेमंत गोडसे यांनाच सुटण्याचे चान्सेस जास्त आहे. मतदार संघातील जनसंपर्क आणि विकासकामाच्या जोरावर गोडसे निवडून येऊ शकतात. मात्र शिवसेनेचा एकच शिंदे गट सोबत असल्यानं त्याचा थोडाफार फटका त्यांना बसू शकतो. दुसरीकडे मात्र आश्चर्यकारकरीत्या भाजपनेही या मतदारसंघावर दावा केल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. नाशिक शहरात तीन आमदार, महापालिकेची सत्ता आणि मजबूत संघटन असल्याने नाशिकची जागा भाजपकडे घ्यावी, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावलाय. भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अलीकडेच स्वतःच्या उमेदवारीचीही घोषणा केलीय.

वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या उमेदवारीला पाठींबाही देऊ केलाय. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटात या जागेसाठी बरीच रस्सीखेच बघायला मिळू शकते. त्यात छगन भुजबळ अजित पवार गट म्हणजेच महायुतीत असल्याने ते या सगळ्यात नेमकी काय भूमिका घेणार? हाही प्रश्न महत्त्वाचा आहेच! दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सुरुवातीला ही जागा ठाकरे गट लढवेल असं जवळपास ठरलं होतं मात्र शरद पवार गटानेही या जागेवर प्रेम केल्यानं इथंही तिकीट वाटपावरून बराच सावळा गोंधळ आहे. यात कमी होती की काय म्हणून काशीनंतर यावेळी नरेंद्र मोदी नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या राजकीय वावड्या उठल्या. त्यामुळे नाशिककरांना सध्या त्यांच्याच जिल्ह्याच्या राजकारणाचा फारसा अंदाज येताना दिसून येत नाहीये. त्यामुळे या सगळ्या महासंग्रामातून नाशिकचा पुढचा खासदार कोण? तुमचा कौल कुणाला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…