हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिकमधून उमेदवारी मिळण्यासाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे अक्षरशः देव पाण्यात सोडून बसले होते. आठवड्यांमागून आठवडे उलटत गेले तरी नाशिकचा तिढा काही सुटता सुटेना. अखेर छगन भुजबळांनी लोकसभेच्या मैदानातून जाहीर माघार घेतली. आणि हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचं काळीज हलकं झालं. नाशिक मधूनच ते पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार असणार आहेत. पण उमेदवारीसाठी गोडसेंना करावी लागणारी उरफोड तिकीट मिळाल्यानंतरही काही कमी होताना दिसत नाहीये. हेमंत गोडसेंचं काही केल्या काम करणार नाही, असा स्टॅन्ड भाजपच्या आमदारांनी घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांची फोर्सही गोडसेंच्या उमेदवारीवर नाक मुरडून आहे.
या सगळ्यामुळे झालंय असं की, नाशकात राजाभाऊ वाजे यांची मशाल पेटणारच! असा सूर सर्वच पातळीवर उमटू लागल्यानं आता मुख्यमंत्री शिंदेंनी सगळी सूत्रं आपल्या हातात घेतलीयेत. हेमंत गोडसेंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतानाच त्यांनी गोडसेंनाच दमदाटीची भाषा वापरलीय. एखाद्या चित्रपटाच्या क्लायमॅक्सपेक्षा अनेक चढ उतार पाहायला मिळणाऱ्या नाशकात मशाल एक्सट्रा एफर्ट न घेता आघाडीवर कशी आहे? विजय करंजकर, शांतिगिरी महाराज, अनिल जाधव यांनी हेमंत गोडासेंना दिवसाढवळ्या चांदण्या कशा दाखवल्यात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना दमदाटी करावी लागण्याइतपत हेमंत गोडसे यांनी केलंय तरी काय? या सगळ्याचाच पोस्टमार्टम जाणून घेऊयात ..
तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर हेमंत गोडसे यांच्या प्रचाराला सुरुवात केली जाईल, असं बोललं गेलं. प्रत्यक्षात मात्र गोडसेंच्या प्रचाराला महायुतीतील नेतेमंडळी सध्या तरी फारसे इच्छुक नसल्याचं पाहायला मिळतंय. हे सगळं पाहता शेवटी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री शिंदेंना नाशिकची वाट धरावी लागली. त्यांनी नाशिकात मेळावा घेतला. जवळच्याच पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवाय हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करण्याचा शब्दही दिला. पण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीला सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली. महायुतीचे तिन्ही घटक पक्ष गोडसेंना उमेदवारी मिळाल्यानंतर पांगलेले आहेत. त्यांच्या उमेदवारीवर भाजप, राष्ट्रवादी आणि स्वतः शिवसेना पक्षातूनही मोठा विरोध होतोय. हा सगळा सावळा गोंधळ पाहून मुख्यमंत्री शिंदेंनी गोडसेंवरच जाळ अन धूर काढला…
गोडसेंना उमेदवारी देऊ नका असे मला सर्वच जण सांगत होते. पण, शिवसैनिकावर अन्याय होऊ देणार नाही असे मी ठरवले. कार्यकर्ता हाच खासदार, आमदार बनवत असतो. त्यामुळे त्यांच्या अडीअडचणींत धावून जा, त्यांना आवश्यक मदत करा. त्यांचे फोन उचला, कॉल डायव्हर्ट करू नका, पोलिस ठाणे, हॉस्पिटलसारखी लहान-मोठी कामे करा. अन्यथा निवडणुका आल्या, की मला विनंती करावी लागते… अशा तिखट शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्याच उमेदवाराच्या प्रचारात कान टोचलेत. आमदार, नगसेवकांच्या कामात हस्तक्षेप करू नका, नाहीतर माझ्याशी गाठ असल्याचा अप्रत्यक्ष दमच शिंदेंनी गोडसेंना भरला. त्यामुळे उमेदवारी घेऊन आपण चूक तर केली नाही ना? असा प्रश्न या सगळ्या प्रकारावर हेमंत गोडसेंना पडला असावा.
महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तर उघडपणे गोडसे यांची निष्क्रिय खासदार म्हणून हेमंत गोडसेंना टोमणा मारला होता. भुजबळ, कोकाटे अशा नाराजवंतांची फौज, शांतिगिरी महाराज यांची अपक्ष उमेदवारी हे सगळं हेमंत गोडसे यांच्या विरोधात जाताना दिसतय. आपल्या खासदारकीच्या काळात सर्वपक्षीय नेत्यांशी फटकून वागण्याची मोठी किंमत आता त्यांना चुकती करावी लागतेय. पण यामुळे ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होतोय. सगळं निगेटिव्ह मध्ये जाणार वातावरण पाहता नाशकात मशाल पेटून हेमंत गोडसे हे लोकसभेच्या मैदानात जोरदार आपटतील, असं म्हणायला फुल टू स्कोप आहे. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.