National Digital Clock Design Contest । भारतीय रेल्वेने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर डिजिटल घड्याळांचे प्रमाणीकरण करण्यासाठी राष्ट्रीय डिझाइन स्पर्धा जाहीर केली आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाने एकूण ३ श्रेणींमध्ये हि स्पर्धा आयोजित केली आहे. पहिली श्रेणी आहे व्यावसायिक, दुसरी श्रेणी आहे महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थी आणि तिसरी श्रेणी आहे शालेय विद्यार्थी…. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक श्रेणीत विजेत्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
याबाबत रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमारयांनी सांगितलं कि, स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी कोणत्याही वॉटरमार्क किंवा लोगोशिवाय हाय -रिझोल्यूशन डिजिटल घड्याळ डिझाइन सादर करणे आवश्यक आहे. तसेच सबमिशनसोबत मौलिकतेचे प्रमाणपत्र आणि डिझाइन थीम स्पष्ट करणारी संकल्पना नोट असणे आवश्यक आहे.
या स्पर्धेत (National Digital Clock Design Contest) सर्व भारतीय नागरिक भाग घेऊ शकतात. जर तुम्हाला या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल, तर १ मे २०२५ ते ३१ मे २०२५ पर्यंत contest.pr@rb.railnet.gov.in या ईमेल वर तयार केलेली डिझाईन पाठवावी लागेल. महत्वाची बाब म्हंणजे एक व्यक्ती एकापेक्षा जास्त डिझाईन सुद्धा पाठवू शकतो. व्यावसायिक, महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थी आणि शालेय विद्यार्थी असे सर्वच जण डिझाईन पाठवू शकतात. म्हणजेच काय तर ५ लाख रुपये जिंकण्याची सर्वाना समान संधी आहे.
महत्वाच्या सूचना: National Digital Clock Design Contest
स्पर्धेच्या नियम आणि अटी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (indianrailways.gov.in) तपासा.
फसवणुकीपासून सावध रहा; केवळ अधिकृत स्रोतांवरून माहिती घ्या.
डिझाइन सादर करताना सर्व तांत्रिक निकष आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा.