सीमेवरील जवानांसाठी रोहित पवारांनी केंद्राला सुचवली जबरदस्त कल्पना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी लष्कर उपप्रमुख जनरल एस. के. सैनी यांनी जवानांच्या बद्दल वक्तव्य करताना म्हंटल होत की सीमेवर लढणाऱ्या जवानांना लागणारे उबदार कपडे आपल्याला आयात करावे लागतात. पण ही आयात आपण आणखी किती दिवस करत राहणार? जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत. लष्कर उप प्रमुखांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला एक जबरदस्त कल्पना सुचवली आहे. आपल्या फेसबुक पेज द्वारे रोहित पवार यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

रोहित पवार म्हणतात , लडाखमध्ये चीन सीमेवर शत्रूशी लढताना आपल्या वीर जवानांना प्रतिकूल परिस्थितीमुळं निसर्गाशीही दोन हात करावे लागतायेत. तरीही आपले वीर न डगमगता भारतभूमीचं अहोरात्र संरक्षण करतायेत. या पार्श्वभूमीवर लष्कर उपप्रमुख ले. जनरल एस. के. सैनी यांनी जवानांसाठी आवश्यक असलेल्या उबदार कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्याची बातमी वाचनात आली. सीमेवर आपले जवान उणे ५० अंश सेल्सिअस एवढ्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत भक्कम पाय रोवून उभे आहेत. त्यांना लागणारे उबदार कपडे आपल्याला आयात करावे लागतात. पण ही आयात आपण आणखी किती दिवस करत राहणार? जवानांना लागणाऱ्या वस्तू या आपणच बनवल्या पाहिजेत. आयात थांबवून आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे, असं वक्तव्य सैनी यांनी केल्याचा उल्लेख त्या बातमीत आहे.

त्यांचा हा विचार मला खूप आवडला. नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिलाच आहे, तर त्याची सुरवात जवानांसाठी लागणाऱ्या साहित्यापासून करायला हरकत नाही. आणि फक्त आत्मनिर्भर होऊनच भागणार नाही तर या साहित्याचा दर्जाच एवढा उत्तम असेल की आपण त्याची निर्यातही करू शकू. कारण आपल्या देशात बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची तयारी आणि मनुष्यबळ मुबलक आहे. विशेष म्हणजे आज सीमेवरील स्फोटक स्थिती लक्षात घेता याची गरज आणि संधीही आहे.

त्यासाठी देशातील कंपन्या आणि युवांना चॅलेंज दिलं तर आपल्या देशातील टेक्सटाईल उद्योगातील अनेकजण योग्य डिझाईनचे दर्जेदार कपडे नक्की बनवून देतील, याबाबत काही शंका नाही. पण या तयार कपड्यांची खरेदी लालफितीत न अडकता तातडीने कशी होईल, याकडंव तेवढंच लक्ष द्यावं लागेल. देशात कोरोनाने हातपाय पसरले तेंव्हा मास्क आणि PPE किट आपल्याला आयात करावे लागत होते, किंबहुना अधिकचे पैसे मोजूनही ते पुरेसे उपलब्ध होत नव्हते, अशी सुरवातीची अवस्था होती, पण आज त्याच्या नेमकी उलट स्थिती आहे. उच्च दर्जाचे मास्क आणि PPE किट आपण फक्त तयारच करत नाही तर निर्यातही करत आहोत. हाच अनुभव जवानांना लागणाऱ्या साहित्याच्या बाबतीतही आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय याचा दुहेरी फायदा आहे तो म्हणजे आपलं परकीय चलन वाचेल आणि निर्यातीतून त्यात भरही घालता येईल. म्हणून आज त्याची अधिक गरज आहे.

चीनने सीमेवर ६० हजार सैन्य तैनात केल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झालीय. त्यामुळं आणखी किती काळ ही स्फोटक स्थिती असेल याचा अंदाज या घडीला कोणीही वर्तवू शकत नाही आणि तणाव निवळला तरीही चीनचा आजवरचा आपला अनुभव लक्षात घेता त्यावर लगेच विश्वास टाकणंही धाडसाचं ठरेल. त्यामुळं आत्मनिर्भर होण्याच्या लष्कर उप प्रमुखांच्या विधानाचं स्वागत करुन त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारने जरूर पावलं उचलावीत आणि सरकार याचा निश्चित सकारात्मक विचार करेल, ही अपेक्षा, असं रोहित पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment