सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात एका उल्लेखनीय उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि छत्रपती शिवाजी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १० जानेवारी २०२० रोजी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय काव्यवाचन आणि कथाकथन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
देशभरात महाविद्यालयीन आणि उच्च महाविद्यालयिन शिक्षण घेणाऱ्या मराठी भाषिकांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं मत छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केलं आहे.
काव्यवाचन स्पर्धेसाठी स्वरचित कविता सादर करायची असून कथाकथन स्पर्धेसाठी ग्रामीण, नागरी, दलित, आदिवासी, रंजनवादी, प्रबोधनपर कथा घेता येणार आहेत. मराठी साहित्याच्या आणि कलेच्या प्रांतात एकेकाळी यशाच्या उत्तुंग शिखरावर असलेले काव्यवाचन आणि कथाकथन हे प्रकार हल्ली लोप पावताना दिसत आहेत. समाजामधील या घटकांची रुची कायम रहावी, महाविद्यालयीन युवक-युवतींना या प्रकाराविषयी नव्याने माहिती व्हावी हा उद्देश यामागे असल्याचं सुभाष वाघमारे यांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9890726440 आणि 9421133089 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे.