अहमदनगर प्रतिनिधी | शिर्डी येथे २३ वर्षांखालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. राहाता तालुका कुस्ती तालीम संघाने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या रेश्मा माने हिने सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राला पदकतालिकेत आघाडी मिळवून दिली. २६ राज्यांमधील शेकडो कुस्तीपटूंनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. पहिल्या दिवशी पार पडलेल्या सामन्यांत महाराष्ट्राच्या सिकंदर शेखने सुवर्णपदक पटकावलं होतं.
तीन दिवस सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये दुसऱ्या दिवशी महिला कुस्तीपटूंची फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये कोल्हापुरच्या रेश्मा माने हिने ६२ किलो वजन गटात दिल्लीच्या अनिताचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला कुस्तीगिरांची कुस्ती बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी विशेषतः महिलांनी गर्दी केली होती.
महाराष्ट्रामध्ये महिला कुस्तीपटूंची संख्या कमी असली तरी, रेश्माने मात्र महिला कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध करत सुवर्णपदक जिंकून इतर महिला आणि तरुणींपुढे आदर्श निर्माण केला आहे. रेश्माच्या यशाने येणाऱ्या काळात हरियाणा राज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या महिला कुस्तीपटूसुद्धा कुस्तीचा आखाडा गाजवतील अशी अशा बाळगायला हरकत नाही.