नवी दिल्ली | मुसळधार पाऊस आणि महापुराचा फटका बसल्याने देशभरात यंदा जवळपास १००० लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर १७ लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयातील आकडेवारीनुसार केरळसह ५ राज्यांना पाऊस व महापुराचा मोठा फटका बसला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक ४०० लोक केरळमधीलच आहेत.
पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम व केरळ या ५ राज्यांतील ७० लाख लोकांना या परिस्थितीचा फटका बसला असून वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. मृतांचा आकडा वाढीव असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. केरळमधील ५४ लाख पुरग्रस्तांपैकी १४ लाख लोकांना शासकीय आधार केंद्रात हलविण्यात आलं आहे. याआधी २००७ साली उद्भवलेल्या आपत्तीत १२०० लोक मृत्युमुखी पडले होते. केंद्र सरकारने अद्यापही राज्य सरकारांना पुरेसा निधी उपलब्ध करुन दिलेला नाही.