राष्ट्रवादी भाकरी फिरवणार; रामराजेंना लोकसभेला संधी? पण सातारा की माढा ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रामराजे नाईक निंबाळकर यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. रामराजेंना आता आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. परंतु रामराजेंना सातारा मतदारसंघातुन तिकीट मिळणार की माढा मतदार संघातून हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

रामराजे नाईक‌ निंबाळकर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त फलटण येथील आयोजित कार्यक्रमात जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांनीही रामराजेंच्या लोकसभा उमेदवारी बाबत सूचक विधान केलं आहे. राजेंनी आपलं नेतृत्व दिल्लीत करायला हवं. महाराष्ट्र सरकार कडून जे जे काही आणायचं होते ते रामराजेंनी आणलं आहे. आता केंद्र सरकारकडून जे काही आणायचे आहे त्यासाठी रामराजेंना आपल्याला दिल्लीला पाठवायला हवं असं जयंत पाटील म्हणाले. हाच संदेश घेऊन मी मुंबईला जाणार आहे. मी अजून रामराजेंना याबाबत विचारलं नाही, परंतु त्यांच्या मनात असो किंवा नसो, रामराजेंना दिल्लीला जावेच लागेल असं म्हणत जयंत पाटील यांनी रामराजेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.

दरम्यान, जयंत पाटील यांनी हे सूचक संकेत दिल्यानंतर अजित पवार यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. प्रदेशाध्यक्षांनी जी सुचना केली. त्याला माझं अनुमोदन आहे. आम्ही ही गोष्ट पवार साहेबांकडे मांडल्यावर ते सुद्धा मान्यता देतील. त्यामुळे आता रामराजेंना लोकसभेत पाठवायची तयारी करावी लागेल असे संकेत अजित पवारांनी दिले. मात्र रामराजेंना साताऱ्यातून तिकीट देणार कि माढा मतदार संघातून हे मात्र कोणी सांगितलं नाही.