पुतण्याच्या आव्हानानंतर काका उद्या बालेकिल्ल्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काका शरद पवारांचा हा दौरा विशेष मानला जात आहे. यावेळी जिल्ह्यातील राजकीय नेते त्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यात सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या सातारा दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

खा. शरद पवार हे रविवार, दि. 3 डिसेंबर रोजी सातारा जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. सकाळी 10 वाजता सर्कीट हाऊस पुणे येथून सातार्‍याकडे मार्गस्थ होणार आहेत. दुपारी 12.30 वाजता सर्कीट हाऊस सातारा येथे त्यांचे आगमन होणार आहे. दुपारी 12.30 ते 2.30 यावेळेत खा. शरद पवार हे सर्कीट हाऊस सातारा येथे थांबणार असून जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांची भेट घेवून विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. शासकीय विश्रामगृहानंतर दुपारी 2.30 वाजता जकातवाडी ता. सातारा येथील माजी आमदार लक्ष्मण माने यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

जकातवाडीतील कार्यक्रमानंतर शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर माजी आ. प्रभाकर घार्गे कुटुंबियांच्या विवाह समारंभास उपस्थित राहून त्यानंतर खा. शरद पवार हे पुण्याकडे रवाना होणार आहेत. खा. शरद पवार यांच्या सातारा दौर्‍याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खा. शरद पवार काय कानमंत्र देतात? तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणीसह जिल्ह्यातील विविध विषयावरही ते पदाधिकार्‍यांबरोबर चर्चा करणार असल्याचे बोलले जात आहे.

पुतण्याच्या टीकेला काका उत्तर देणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जतमधील वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा सातारा दौरा विशेष मानला जात आहे. अजित पवारांनी केलेल्या टीका आणि गौप्यस्फोटांना शरद पवार काय उत्तर देणार, याबद्दलही उत्सुकता आहे. सातारा लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे अजित पवारांनी काल जाहीर केले आहे. त्यासंदर्भात साताऱ्यातील उमेदवारी बाबत शरद पवार काय संकेत देणार, याकडे सातारकरांचे लक्ष असणार आहे.

कर्जतच्या सभेत अजित पवार काय म्हणाले होते?

रायगडमधील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काल शिबीर पार पडले. या शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघासह शिरूर, सातारा आणि रायगड या ठिकाणी लोकसभा निवडणुका आपण लढवणार आहोत, अशी घोषणा केली. तसेच सभेतून काका खा. शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. काहीजणं पावसात भिजण्याचं नाटक करतात, असा जोरदार हल्लाबोल पवार यांच्यावर त्यांनी केला.