केंद्रातील मोदी सरकारची सत्ता उलथवून टाकण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी INDIA आघाडीची स्थापना केली. Indian National Developmental Inclusive Alliance असं या आघाडीचे नाव …. राहुल गांधी, लालू यादव, नितिंशकुमार, शरद पवार, उद्धव ठाकरे, एमके स्टालिन, अरविंद केजरीवाल , फारूक अब्दुल्ला, अखिलेश यादव यांसारख्या देशातील अनेक वर्षाचे राजकारण कोळून प्यायलेले आणि एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांनी एकत्र येत थेट मोदींच्या पंतप्रधानपदाच्या खुर्चीलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीच्या टप्प्यात या इंडिया आघाडीच्या अनेक बैठका पार पडल्याने भाजपची केंद्रातील सत्ता हलणार कि काय अशी शक्यताही निर्माण झाली… परंतु जसजसं निवडणुका जवळ येऊ लागल्या तस तस इंडिया आघडी बॅकफूटवर पडू लागली… आता तर लोकसभेसाठी मतदानाचा पहिला टप्पाही पार पडला, एकीकडे नरेंद्र मोदी संपूर्ण देशात झंझावाती प्रचार आणि सभा घेत असताना इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही… इंडिया आघाडीतील प्रत्येक प्रमुख नेता राज्यातच अडकून पडला आहे आणि याला कारण म्हणजे भाजपने टाकलेले अचूक डावपेच …
भाजपने साम दाम दंड भेद अशी सर्व अस्त्रे वापरून विरोधकांना घायाळ करण्याचा प्लॅन आधीपासूनच आखला होता असं दिसतंय… याची सुरुवात झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारखे प्रादेशिक पक्ष फोडून… .. शिवसेनेतून एकनाथ शिंदे याना हाताशी धरून भाजपने सर्वात आधी महाविकास आघाडीला सुरुंग लावला आणि देशभरातील विरोधी पक्षांना पहिला इशारा दिला होता. शिंदेंना फोडून अधिक काही फायदा होणार नाही याची कुणकुण लागली म्हणून कि काय भाजपने अजित पवारांना सुद्धा आपल्या सोबत घेतले. दोन्ही नेत्यांना सोबत घेताना भाजपने कोणतीही विचारधारा जपली नाही.. भ्रष्ट्राचाराचे आरोप केलेल्या अजितदादांना सोबत घेणं म्हणजेच इंडिया आघाडीची मोट बांधणाऱ्या शरद पवारांना महाराष्ट्रातच थांबवणे हाच भाजपचा अजेंडा होता हे आता स्प्ष्ट झालं आहे. कारण ज्या शरद पवारांमध्ये देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्याची ताकद आहे तेच पवार आज राष्ट्रवादी फुटीमुळे महाराष्ट्रात अडकून पडले आहेत. हीच गोष्ट आहे उद्धव ठाकरेंची…. शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंसाठी महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकवण आणि शिवसैनिकांना विश्वास देणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेही महाराष्ट्रातच थांबून रणनीती आखत आहेत.
यानंतर इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसला तो म्हणजे बिहारच्या नितीशकुमारांमुळे… राजकारणातले पलटूराम म्हणून हिणवलं जाणारे नितीश कुमार महत्वाच्या क्षणी पलटी मारून भाजपसोबत गेले. खरं तर याच नितीशकुमार यांनी पुढाकार घेऊन इंडिया आघाडीची मोट बांधली होती, देशातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन एकत्र येण्याचा संदेश दिला होता. नितीशकुमार हे इंडिया आघाडीचे संयोजकही होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली पाटण्यात इंडिया आघाडीची पहिली महाबैठक पार पडली होती. मात्र त्यांनी अचानक बिहार सरकारचा पाठिंबा काढत भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि लालूप्रसाद यादव- तेजस्वी यादव याना बिहारमध्येच अडकून ठेवलं… तीच परिस्थिती उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांची आहे. अयोध्येतील राम मंदिर भाजपने प्रचाराचा मुद्दा केलाय.. अयोध्येतील विमानतळ, उत्तर प्रदेशातील वाढलेलं पर्यटन,,, राम मंदिर उदघाटन या मुद्द्यावरून योगी आदित्यनाथ मतदारांना साद घालत असताना त्यांना शह देताना अखिलेश यादव यांच्या नाकीनऊ आलेत.. त्यामुळे ते सुद्धा उत्तर प्रदेशच्या राजकारणात अडकून पडलेत.. जागावाटपाच्या मुद्द्यावरून सुद्धा काँग्रेस आणि समाजवादी पक्षात खूप उशिरा वाटप झालं… एम के स्टालिन, सीताराम येचुरी, मेहबुबा मुफ्ती, फारूक अब्दुल्ला, डी. राजा यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांशिवाय या नेत्यांचा इंडिया आघाडीत काहीही प्रभाव पडू शकत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे, तपास यंत्रणांच्या भीतीने इंडिया आघाडीतील अनेक नेते भाजपविरोधी ठोस अशी आक्रमक भूमिका घेताना दिसत नाहीत. याचे उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकीकडे भाजपविरोधी लढ्याचा नारा देतात अन दुसरीकडे काँग्रेस विरोधात उमेदवार देऊन भाजपच्याच सोयीची भूमिका घेताना दिसतात… दुसरीकडे मोदींना सक्षम पर्याय म्हणून ओळखले जाणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तुरुंगात आहेत. खरं तर अत्यंत कमी कालावधीत केजरीवालांनी मोठं राजकीय यश मिळवलं आणि लोकोपयोगी कामाच्या माध्यमातून ते अल्पकाळातच लोकप्रिय मुख्यमंत्री सुद्धा ठरले. मात्र दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल यांच्यावर आरोप झाले आणि सध्या ते तुरुंगात आहेत. पक्षाचा मुख्य नेताच जेलमध्ये असल्याने आम आदमी पक्षाचे उरलंसुरलं अवसान गळालं आहे. याच घोटाळ्यात केसीआर यांच्या कन्या के कविता यांनाही ईडीने अटक केली आहे. प्रादेशिक पक्षांवर भाजप हल्ला करत असताना काँग्रेस सुद्धा खंभीरपणे भाजपविरोधी लढताना दिसत नाही. देशातील महागाई, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणार कवडीची हमीभाव, यांसारख्या मुद्यांना हात घालताना जो आक्रमक बाणा असायला हवा तो दिसत नाही. एकूणच काय तर मतदानाचा पहिला टप्पा पार पडला तरी इंडिया आघाडीमध्ये जी एकी अपेक्षित होती ती काय पाहायला मिळत नाही. भाजपने अतिशय चतुराईने टप्प्यात इंडिया आघाडीचा करेक्ट कार्यक्र्म केला असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही…