नेवासा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीची गुंतागुंत वाढली, आमदार फिक्स ‘हा’ चेहरा होतोय

Nevasa Vidhan Sabha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या हवामानाचा आणि नेवासाच्या अंदाज लावणं फार कठीण… इथं जनतेनं अनेक मातब्बरांना घरचा रस्ता दाखवला… नव्यांना संधी दिली… कधी कधी बंडखोरी दाखवत कम्युनिस्ट नेत्यांनाही संधी दिली.. सध्या इथले विद्यमान आमदार आहेत शंकरराव गडाख… 2019 ला अपक्ष निवडून आलेल्या गडाखांनी भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटेंना घरचा रस्ता दाखवला होता… गडाख अपक्ष असले तरी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा देत कॅबिनेट मंत्रीपदाचाही अनुभव आपल्या पारड्यात पाडून घेतला… त्यामुळे यंदा ठाकरेंकडून शंकरराव गडाख तर भाजपकडून बाळासाहेब मुरकुटे अशी आपल्याला प्लेन लढत दिसत असली तरी इच्छुकांनी प्रचाराचा धुराळा उडवल्याने तालुक्यातील अनेक प्रस्थापितांनी उमेदवारीसाठी राजकारणाची पेरणी करायला सुरुवात केलीये… त्यामुळे नेवासात यंदा उमेदवारी कशी असेल? विरोधात भाजपचा चेहरा असतानाही शिंदे गटाने नेवासासाठी कसं राजकारण वाढवून ठेवलंय? गडाख विरुद्ध गडाख अशा नवीनच संघर्षाला विधानसभेच्या निमित्ताने सुरुवात होऊ शकते का? त्याचाच घेतलेला हा आढावा…

गोदावरी प्रवरा आणि मुळा या तीन नद्यांचं मिलन होणारा प्रवरा संगम… जिथं ज्ञानेश्वरीचे अभंग उमटले ते धार्मिक तीर्थक्षेत्र… शनिशिंगणापूर पासून ते थेट देवगड देवस्थान सारखा मोठा धार्मिक वारसा जसा या नेवासा विधानसभेला लाभलाय तितकाच मोठा राजकीय वारसा देखील… माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय पेरणीतून तयार झालेला हा मतदारसंघ… मुळा सहकारी साखर कारखाना – मुळा एज्युकेशन सोसायटी यांसारख्या सहकारी आणि संस्थात्मक जाळ्यांची प्रवराला माहिती झाली ती गडाखांमुळेच… स्थानिक स्वराज्य संस्था असो की शनिशिंगणापूर सारख देवस्थान या सगळ्या सत्तेच्या स्थानांवर गडाख फॅक्टरच आजही जोरात चालतो… हे सगळं सांगण्याचा मूळ कारण म्हणजे गडाख या कुटुंबाला नेवासाच्या राजकारणातून वगळून चालत नाही, हे आपल्या ध्यानात यावं… यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे पाटील, तुकाराम गडाख, नरेंद्र घुले, असा खासदारकीचा प्रवास करत मतदारसंघाचा इतिहास येऊन पोहोचतो तो 2009 पर्यंत…

इथे झालं असं की, नगर नेवासा आणि शेवगाव नेवासा या दोन मतदारसंघाचं एकत्रीकरण करण्यात येऊन… यातला काही भाग वगळून… स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला… आणि याच स्वतंत्र मतदारसंघात यशवंतराव गडाखांनी आपला राजकीय वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केला… आणि शंकरराव गडाख पहिल्यांदा आमदार झाले…. मात्र या प्रस्थापित गडाख कुटुंबाची पाळमुळ घराघरात पोचलेली असतानाही 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक जायंट किलर ठरले… प्रस्थापित गडाखांना पराभवाचा मोठा धक्का बसला…. मात्र 2019 ला पराभवाचे उट्टे काढत ते पुन्हा आमदार झाले पण कुठल्या पक्षाच्या तिकिटावर नाही तर अपक्ष म्हणून… अर्थातच राष्ट्रवादीनं त्यांना बाहेरून पाठिंबा दिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला होता… महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला… जलसंधारणाचं कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळलं… शिवसेनेच्या फुटीतही ते ठाकरेंशीच एकनिष्ठ राहिल्याने सध्या महाविकास आघाडी कडून मशालीच्या चिन्हावर शंकरराव गडाख विधानसभेच्या रिंगणात दिसतील, हे तर जवळपास कन्फर्म आहे… मात्र लोकसभा निवडणुकीत नेवासात शिवसेनेच्या शिंदे गटाला लीड होतं… त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळेल म्हणून वाट पाहत बसलेल्या बाळासाहेब मुरकुटेंसाठी शिवसेना शिंदे गटानं नेवासा मतदारसंघावर क्लेम केल्याने महायुतीचा उमेदवार कोण? या चा मोठा झांगडगुत्ता झाला आहे…

बाळासाहेब मुरकुटे, ऋषिकेश शेटे हे दोघेही भाजपकडून इच्छुक असले तरी मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या हालचाली पाहता भाजपच्या स्वप्नांवर विरजन पडेल की काय? याची शक्यताही नाकारता येत नाही… कारण शिंदेंनी मतदारसंघात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केलीय.. शिवसेनाच साखरपट्ट्यात परिवर्तन आणू शकते, असं म्हणत माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्रमकपणे नेवासाच्या उमेदवारीची मागणी केली आहे… विधानसभा निरीक्षक डेव्हिड जेरी यांनी जातीने लक्ष घालत धनुष्यबाण मतदार संघातील घराघरात कसं पोहोचेल? यासाठी तालुका पिंजून काढायलाही सुरुवात केली आहे… बाळासाहेब पवार, भगवान गंगावणे, नितीन औताडे ही नाव शिंदे गटाकडून इच्छुक असली तरी गडाखांच्या वर्चस्ववादी राजकारणाला सुरुंग लावतील, इतकी त्यांच्यात ताकद नक्कीच नाहीये… त्यामुळे मतदारसंघातील एक युवा चेहऱ्याचा तातडीने पक्षप्रवेश शिंदे गटाकडून होऊ शकतो… यात क्रमांक एकवर नाव येत ते माजी खासदार तुकाराम गडाख यांचं… गडाख यांचे सुपुत्र रविराज गडाख आणि त्यांचे बंधू किसनराव गडाख यांपैकी एका चेहऱ्याने धनुष्यबाण हाती घेतलं तर गडाख विरुद्ध गडाख असा ऐतिहासिक सामना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळू शकतो… पण यात भाजपच्या इच्छुकांची भूमिका काय राहणार? यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत…

मतदारसंघात बंडखोरी झाली तर त्याचा फायदा गडाखांना होत आल्याचे राजकीय पुरावे आहेत… त्यामुळे मुरकुटे आणि शेटे यांनी शांत राहणं… शिंदे गटाच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करणं… यावर नेवासाच्या निकालाबद्दल स्पष्टपणे बोलता येईल… विद्यमान आमदार गडाखांच्या पाठीशी सहकार संस्थांच जाळ, शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणि सहानुभूती, आघाडीची ताकद, मुस्लिम – दलित समाजाचे मतदान असणार आहे… तर दुसऱ्या बाजूला लोकसभेला मिळालेलं लीड, गडाख विरोधी नेत्यांची एकजूट, बंडखोरांची ताकद आणि राज्याची सत्ता असणार आहे… त्यामुळे या दोन्ही बाजूंची आकडेमोड करून पाहिली तर नेवासाचा आमदार नेमका कोण होतोय? तुम्हाला काय वाटतं? गडाखांच्या वर्चस्ववादी राजकारणाला कुणी खिंडार पाडेल की तेच पुन्हा एकदा या अनप्रेडिटटेबल मतदारसंघाचं पुन्हा एकदा प्रतिनिधित्व करतील? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…