व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राज्यात पुन्हा सत्तांतर होणार, शिंदे गटातील आमदार संपर्कात; राऊतांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात असून राज्यात लवकरच सत्ताबदल झाल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही असं मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालय संविधान आणि कायद्याविरोधात जाऊन निकाल देणार नाही याची आपल्याला खात्री असल्याने शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरतील. त्यांना स्वतःचा बचाव करण्याकरता दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागले, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. हे आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर झालं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.

यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारी वरूनही टोला लगावला. यापूर्वी शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीला यावं लागलं नाही. शिवसेनेचं हायकमांड कायम मुंबईत राहिलं युती करण्यासंदर्भात अमित शाहदेखील मातोश्रीवर आले होते. मात्र आता पाच वेळा मुख्यमंत्र्यांना दिल्लीला यावं लागत असल्याने आता बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतात का असंही वाटू लागलं आहे,” असा चिमटा संजय राऊतांनी काढला.