नवा आदेश : सातारा जिल्ह्यात धरणालगत 200 मीटरपर्यंत बांधकामास बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील धरणे, पाणी प्रकल्प आणि त्यांच्या पाणलोट क्षेत्रात 200 मीटर अंतरापर्यंत बांधकामांना बंदी घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य शासनाने बांधकामांना बंदी घातल्याचे जल संपदा विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता धरण क्षेत्रात बांधकाम करताना काळजी घ्यावी लागणार आहे.

सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील कोयना धरण हे राज्यातील मोठ्या धरणात समावेश होतो. त्यासोबत उरमोडी धरण, वीर धरण, तारळी धरण, धोम- बलकवडी असे अनेक छोटे-मोठी धरणे जिल्ह्यात आहेत. त्यासोबत कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र हे तापोळा, बामणोलीसह शिवसागर जलाशय विस्तारलेला आहे. निसर्ग संपन्नेतेने नटलेला हा पाणलोट क्षेत्र पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. पर्यटनाला चालना मिळत असल्याने धरण क्षेत्रात फार्म हाऊस, रेस्ट हाऊस, हॉटेल्स, रेस्टॉरंट उभारलेली आहेत.

परंतु सांडपाण्यामधून धरणांमध्ये होणारे जल प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी धरणांच्या पाणलोट क्षेत्रापासून 75 मीटर अंतरापर्यंत बांधकामास मनाई होती. या नियमात आता बदल करण्यात आला असल्याने जिल्ह्यातील धरणालगतच्या शेकडो अनधिकृत बांधकामांचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने धरणांलगत असलेल्या बांधकामांचा सर्व्हे करून या बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.