सातारा प्रतिनिधी । फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे १९३२ च्या दरम्यान सुरू झालेला ‘न्यू फलटण शुगर’ साखर कारखाना कोट्यावधींची कर्जे घेतल्यामुळे बंद पडला होता. त्यामुळे गतवर्षीच्या हंगामात कारखान्याचे गाळप होऊ शकले नाही. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांची कोट्यवधींची देणी आणि सुमारे ५४५ कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. कॉसमॉस को-ऑ. बँकेने थकबाकीची मागणी केल्यानंतर नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलमध्ये दि. २० फेब्रुवारी २०१९ रोजी न्यू फलटण कारखाना हस्तांतराबाबत कार्यवाही सुरू झाली होती.
मात्र आता थकीत देण्यामुळे बंद पडलेला आणि तोट्यात गेलेला ‘न्यू फलटण शुगर वर्क्स लि.’ हा यंदा ‘दत्त इंडिया शुगर प्रा. लि.’ने ताब्यात घेतला आहे. कारखाना पुन्हा चालू झाल्याने साखरवाडी परिसर पहिल्यासारखा गजबजला आहे. तसेच तालुक्यातील दिवाळखोरीत निघणारी मोठी संस्था वाचून ऊस उत्पादकांचे थकीत पैसे मिळू लागले आहेत. त्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक व कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दत्त इंडियाने पहिल्या टप्प्यात १४ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याने कंगाल होत चाललेल्या ऊस उत्पादकाला दोन वर्षांनी पैसे मिळाले आहेत. त्यामुळे वर्षभर हाताला काम आणि पगार नसलेला कामगारवर्गही उत्साहात काम करू लागला आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे.